Crime News: उल्हासनगरात ‘पठाणी’ कर्जाला कंटाळून महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 09:49 AM2023-01-30T09:49:10+5:302023-01-30T09:49:53+5:30
Crime News: या महिलेने घरसंसार चालविण्यासाठी २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. काही वर्षांत २० हजार रुपयांचे लाखो रुपये व्याज देऊनही रक्कम शिल्लक असल्याचा तगादा व्याजखोरांनी लावला होता.
उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. एक परिसरातील रोहिणी अन्सारी या महिलेने व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून, याबाबत स्थानिक पोलिस अनभिज्ञ आहेत. व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून गिरीष चुग याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ व्हायरल करून आपबीती सांगितल्याची घटना घडली होती.
अन्सारी या महिलेने घरसंसार चालविण्यासाठी २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. काही वर्षांत २० हजार रुपयांचे लाखो रुपये व्याज देऊनही रक्कम शिल्लक असल्याचा तगादा व्याजखोरांनी लावला होता. या त्रासाला कंटाळून महिलेने यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २७ जानेवारी रोजी कर्जावरील व्याज घेण्यासाठी आलेल्या महिलेसमोर त्रासलेल्या अन्सारी हिने पुन्हा आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तेव्हा पैसे वसुलीकरिता आलेल्या महिलेने ‘आमचे पैसे दे व मग आमच्यासमोर फाशी घे,’ असा उफराटा सल्ला दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून, अन्सारीने व्हायरल केला. त्यानंतर त्रासलेल्या अन्सारीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवरा वेळेत घरी आल्याने त्याने रोहिणीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यापूर्वी उल्हासनगर पोलिस ठाण्यात व्याजखोरांच्या त्रासाची तक्रार केली होती, असे रोहिणी अन्सारी हिचे म्हणणे आहे. याबाबत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फुलपगारे यांच्याशी संपर्क केला असता, याबाबत कोणतीही माहिती नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
शहरात पसरली संतापाची लाट
गिरीष चुग व रोहिणी अन्सारी यांच्याबाबतीत घडलेल्या दोन्ही घटनांबद्दल शहरात संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी सोशल मीडियावरून होत आहे. आमदार कुमार आयलानी यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
दरमहा ४० टक्के व्याजदराने घेतले होते कर्ज
शहरातील कॅम्प नं. पाच येथे राहणाऱ्या गिरीष चुग याला दोन महिन्यांपूर्वी सहकाऱ्याच्या चुगलीमुळे गारमेंट दुकानाच्या मालकाने कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे बेकार झालेल्या गिरीशने घरसंसार चालविण्यासाठी काही जणांकडून दरमहा ४० टक्के व्याजाने कर्ज घेतले.
मात्र, घेतलेले कर्ज वेळत दिले नाही म्हणून पैसे देण्याचा तगादा व्याजखोरांनी लावला. हा सर्व प्रकार घरापर्यंत गेल्यावर गिरीशने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
यामध्ये पत्नीची माफी मागून दोन मुलांचा व वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्याची विनंती केली. तसेच पठाणी व्याजाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगताना व्याज वसुलीकरिता छळ करणाऱ्यांची नावे व्हिडीओमध्ये सांगितली. या प्रकाराची माहिती स्थानिक हिललाइन पोलिसांना नाही.