ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदेंच्या दीराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 10:32 PM2018-12-05T22:32:01+5:302018-12-05T22:39:14+5:30
आपली जमीन बळकावल्याची तक्रार ठाण्यातील शेतकरी अशोक कवरे यांनी महापौरांचे दीर विजय शिंदे यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल केली आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांचे दीर विजय शिंदे आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध जमीन बळकावल्याचा आरोप अशोक कवरे या शेतक-याने केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर १५६ कलमान्वये बुधवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
विजय शिंदे यांची महालक्ष्मी डेव्हलपर्स ही बांधकाम व्यवसाय करणारी कंपनी आहे. त्यांनी कासारवडवलीतील शेतकरी कवरे यांच्याकडून २००७ मध्ये ५१ गुंठे जमीन विकासासाठी घेतली होती. त्या मोबदल्यात कवरे यांना शिंदे हे ३१ लाख १५ हजार रुपये देतील, असे ठरले होते. त्यापैकी शिंदे यांनी चार लाख २५ हजार रुपये त्यांना धनादेशाद्वारे दिले. जमीन केवळ विकासासाठी दिलेली असतानाही शिंदे आणि त्यांचा सहकारी संदीप दळवी यांनी खरेदीखतामध्ये अफरातफर करून ती बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकाच मालकाने आपली जमीन तीन ते चार वेळा विकल्याचे प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत यात समोर आले आहे. १५६ नुसार हा गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
‘‘हे प्रकरण नेमके काय आहे, याबाबत माझ्याकडे माहिती नाही. न्यायालयातून दाखल झालेले असल्यामुळे योग्य ती चौकशी होईल. नेमके काय झाले, ते पाहावे लागेल.’’
मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे