मारहाण झालेल्या ‘त्या’ तरुणावर गुन्हा
By admin | Published: June 22, 2017 12:02 AM2017-06-22T00:02:59+5:302017-06-22T00:02:59+5:30
सुट्या पैशांच्या वादातून गोवंडी येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकांना मंगळवारी रात्री
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सुट्या पैशांच्या वादातून गोवंडी येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकांना मंगळवारी रात्री अटक केल्यानंतर, अनावश्यक मागण्या करून पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या सॉफ्टेवअर इंजिनिअरसह त्याच्या बहिणीविरूद्ध नौपाडा पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
मुंबईतील गोवंडी येथील तुषार म्हात्रे याला गावदेवी मैदान परिसरात काही रिक्षा चालकांनी सुट्या पैशाच्या वादातून मंगळवारी रात्री जबर मारहाण केली. पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदींनी तातडीने कारवाई करून तीन रिक्षा चालकांना अटक केली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाश पाटील, अरूण लोखंडे आणि मोहम्मद सलीम शेख ही आरोपी रिक्षा चालकांची नावे आहेत. गावदेवी मैदान परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरही तुषार म्हात्रे आणि त्यांची बहिण दर्शना गाणार यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पोलिसांची गाडी अडवली. आरोपींना पोलीस ठाण्यापर्यंत पायी नेण्याची मागणी करून, पोलिसांच्या वाहनाला लाथ मारली.
पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या मागणीवर कायम राहून ते पोलिसांच्या वाहनासमोर झोपले. लोकांना जमवून गोंधळ घालणाऱ्या या भाऊ-बहिणीविरूद्ध नौपाडा पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तुषार म्हात्रे आणि दर्शना गाणार यांच्यासह आणखी १0 ते १२ अज्ञात आरोपींचा यात समावेश आहे.