उल्हासनगरात दोघांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा
By सदानंद नाईक | Published: July 9, 2023 03:25 PM2023-07-09T15:25:35+5:302023-07-09T15:26:05+5:30
महापालिकेकडे कारवाईची मागणी होत आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३ बर्नर कारखाना, वालधुनी नदी किनारी अवैध बांधकाम करणाऱ्या दोघांवर महापालिका सहायक आयुक्ताच्या तक्रारीवरून एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकारने अवैध बहुमजली आरसीसी बांधकामधारकांचे धाबे दणाणले असून महापालिकेकडे कारवाईची मागणी होत आहे.
उल्हासनगरात अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर, शासनाने अवैध बांधकाम नियमित करण्याचा अध्यादेश खास शहारासाठी काढुन त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला. शासन अध्यादेशानंतर अवैध बांधकामे थांबतील अशी अपेक्षा होती. मात्र शहरात सर्व संमतीने अवैध बांधकामे होत असल्याची चर्चां सुरू झाली. सर्वत्र विनापरवाना आरसीसीची बहुमजली बांधकामे होत आहेत. कॅम्प नं-३, वालधुनी नदी किनारी बर्नर कारखान्या शेजारी उभे राहिलेल्या अवैध बांधकाम प्रकरणी प्रभाग समिती-३ चे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांच्या तक्रारीवरून अविनाश चंद्रप्पा सूनकर, वसप्पा कामद्दा यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या आठवड्यात सोनार गल्लीतील एका बहुमजली अवैध बांधकामावर महापालिका अतिक्रमण पथकाचें प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केली. मात्र त्याच परिसरात बहुमजली अवैध बांधकामे माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने सुरू असून त्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न सोशल मीडियावर महापालिका आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना विचारला जात आहे. पावसाळ्याच्या नावाखाली शहरात शेकडो अवैध बांधकामे सुरू असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अनिल खतुरानी यांना हटवा
महापालिका प्रभाग समिती क्रं-२ च्या सहायक आयुक्त पदी असतांना अनिल खतूरानी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महापालिकेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान खतुरानी यांना पुन्हा महापालिका सेवेत घेत प्रभाग समिती क्रं-१ च्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती केल्याने, त्यांच्या नियुक्तीवर नागरिकांनी प्रश्नचिन्हे उभे केले. महापालिका आयुक्तांनी लाचखोर अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच पदी नियुक्ती देऊ नका. अशी मागणी होत आहे.