उल्हासनगरात एका बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा, तीन महिन्यात १६ बांधकामावर पाडकाम कारवाई
By सदानंद नाईक | Published: March 16, 2024 04:29 PM2024-03-16T16:29:27+5:302024-03-16T16:30:12+5:30
गेल्या तीन महिन्यात १६ अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केल्याची माहिती शिंपी यांनी दिली आहे.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-४, स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बहुमजली अवैध बांधकामावर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. तर गेल्या तीन महिन्यात १६ अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केल्याची माहिती शिंपी यांनी दिली आहे.
उल्हासनगर अवैध बांधकामाबाबत प्रसिद्ध असून पाडकाम झालेले बहुतांश बांधकामे जैसे थे उभे राहिल्याची टीका होत आहे. कॅम्प नं-४, स्टेशन रोड रामनगर याठिकाणी तळमजला अधिक दोन मजल्याचे अवैध बांधकाम निर्माण झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना मिळाल्यावर, त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बांधकाम प्रकरणी विजयशंकर राजकिशोर मिश्रा यांच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानिमित्ताने शहरात असंख्य अवैध बांधकामे सुरू असल्याची टीका होत असून त्यावर पाडकाम कारवाई करण्याची मागणी होत आहे. गेल्या तीन महिन्यात महापालिकेने प्रभाग समिती क्रं-१ कार्यालय अंतर्गत १, प्रभाग समिती क्रं-२ कार्यालय अंतर्गत ५, प्रभाग समिती क्रं-३ कार्यालय अंतर्गत ४ व प्रभाग समिती क्रं-४ अंतर्गत ६ असे एकून १६ अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई करण्यात आल्याची माहिती नूडल्स अधिकारी व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
शहरात खोटे बांधकाम परवाना नामफलक लावून अनेक अवैध बांधकामे सुरू असल्याचे आरोप राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. महापालिका आयुक्तांनी त्याची शहानिशा करून पाडकाम कारवाई करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. कॅम्प नं-१ महादेव कंपाऊंड, टिळकनगर, कॅम्प नं-३ येथील यात्री निवासमागे, खेमानी, गुडमन कॉटेज, गुरुगोविंद शाळा, झुलेलाल मंदिर आदी ठिकाणी बहुमजली व जुन्या बांधकामावर अवैधपणे सर्रासपणे बांधकामे सुरू आहेत. तीच परिस्थिती कॅम्प नं-४ व ५ परिसराची आहे. या अवैध बांधकामावरही एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. तसेच प्रभाग अधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्यावर अन्य विभागाचा पदभार देण्यात आल्याने, मुळ प्रभाग अधिकाऱ्यांचा कामावर अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे.