कोरोना नियम पायदळी तुडविणाऱ्या १२५ व्यापाऱ्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:58+5:302021-03-31T04:40:58+5:30
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शनिवार आणि रविवारी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता ...
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शनिवार आणि रविवारी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी या दोन्ही दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केला होता; परंतु तो न मानता त्या विरोधात रास्ता रोको करून ठिय्या मांडून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या तब्बल १२५ हून अधिक व्यापाऱ्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. फ प्रभागक्षेत्र अधिकारी भरतकुमार पाटील यांनी याप्रकरणी सोमवारी तक्रार दाखल केली होती.
मनपा हद्दीत दरदिवशी नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ९०० हून अधिक आहे. एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने शनिवारी आणि रविवारी यादिवशी खरेदीच्या निमित्ताने दुकानांमध्ये नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी दोन दिवस दुकाने बंद करण्याचा आदेश काढला होता; परंतु शनिवारी सकाळीच या आदेशाबाबत नाराजी व्यक्त करून व्यापाऱ्यांनी मनपाच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडक देऊन ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांनी मनपाचे अधिकारी आणि पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून इंदिरा चौक ते टिळक पुतळ्याकडे जाणाऱ्या भगतसिंग रोडवर आपली वाहने आडवी लावून रास्ता रोकोदेखील केला होता. या आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्याचबरोबर काहींनी मास्कदेखील तोंडाला लावला नव्हता. यामुळे प्रभाग अधिकारी पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जयेश सावला, संदीप रवानी, किरण व्यास, प्रकाश जवेरी, सुनील मोता, पराग गडा, प्रीतेश गुडका, मनीष भानुशाली, अशोक जैन, दिलीप मजरा, हरीश देढिया, अंकित मारू, भरत मोता, पिंकेश शर्मा, रमेश पटेल, अनिल सावला, भरत छेडा, प्रेमजी गाला, विमल गुप्ता, राजेश तांडेल, विनोद संत्र, चेतन गाला, कल्पेश गाला, आश्विन शहा यांच्यासह अन्य १०० ते ११० जणांचा यात समावेश आहे.
------------------------------------------------------