बनावट रॉयल्टीद्वारे रेती वाहतूक करणाऱ्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:24+5:302021-08-18T04:47:24+5:30
मीरा रोड : मीरा-भाईंदर परिसरात रेती वाहतूक करण्यासाठी बनावट रॉयल्टी बनवून शासनाचा लाखोंचा महसूल बुडविणाऱ्या मालक संतोष उपाध्याय विरुद्ध ...
मीरा रोड : मीरा-भाईंदर परिसरात रेती वाहतूक करण्यासाठी बनावट रॉयल्टी बनवून शासनाचा लाखोंचा महसूल बुडविणाऱ्या मालक संतोष उपाध्याय विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात महसूल विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
काशिमीरा परिसरातील प्रसाद इंटरनॅशनल हॉटेलसमोर तलाठी अभिजित बोडके यांनी रेती वाहतूक करणाऱ्या डंपरला अडविले. तीन ब्रासची परवानगी असताना चार ब्रास रेती असल्याने अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांनी दाेन लाख ५१ हजारांचा दंड लावला होता. त्यावर रेती वाहतूकदार यांनी उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांच्याकडे अपील केले होते. त्यावेळी गौण खनिजची वाहतूक करण्यासाठी सादर केलेली पावती बनावट आढळल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांच्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात उपाध्यायविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या महसूल विभागाची बनावट रॉयल्टी बनवून त्याआधारे रेती वाहतूक केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली असून, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शासनाला चुना लावण्यात आल्याची शक्यता पाहता सखोल चौकशीची मागणी होत आहे.