कोरोना कारवाईत अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:36 AM2021-04-05T04:36:10+5:302021-04-05T04:36:10+5:30
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना पालिका पथकाशी भांडण करून अडथळा आणणाऱ्या मीरा रोडच्या ...
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना पालिका पथकाशी भांडण करून अडथळा आणणाऱ्या मीरा रोडच्या शुभम कमलेश दुबे व जय वपाडिया या दोघांविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदरमधील कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता आयुक्त दिलीप ढोले यांनी कारवाईसाठी पथके तैनात केली आहेत. त्या अनुषंगाने पालिका व पोलिसांनी बेजबाबदार लोकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने पथके नेमली असून शनिवारी मीरा रोड भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शुभम कमलेश दुबे व जय वपाडिया यांच्यावर कारवाई करतेवेळी त्यांनी भांडण करून अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय पालिकेने दोन हॉटेलना प्रत्येकी २५ हजार इतका दंड ठोठावला आहे. मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या १७० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने शनिवारी १ लाख ३५ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.