१ कोटी २० लाखांचे वीज देयक थकवणाऱ्यांवर गुन्हे दाखल; वीज पुरवठाही तोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:11 AM2021-07-19T08:11:11+5:302021-07-19T08:12:12+5:30
बीएसईएस लिमिटेड कार्यरत असताना म्हणजे जवळपास दोन दशकांपासून या ग्राहकांची थकबाकी होती. यापूर्वीही ग्राहकांवर करण्यात आली होती कारवाई.
तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे वीज देयक थकवणाऱ्यांवर काशिमिरा पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय अदानी वीज कंपनीने पोलीस बंदोबस्तात या ग्राहकांचा वीज पुरवठाही तोडला.
कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिगावच्या पटेल कंपाऊंड मधील गुलशन पटेल, कुदबुद्दीन पटेल, मुन्शी चांद, ईनुस पटेल, अजीमुल्लाह गफार शेख व तोहीद नासिर पटेल यांनी १ कोटी २० लाखांचे वीज देयक थकवले होते. वीज देयक थकवल्याने कंपनीकडून काशिमिरा पोलीस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या.
बीएसईएस लिमिटेड कार्यरत असताना म्हणजे जवळपास दोन दशकांपासून या ग्राहकांची थकबाकी आहे. अनेकवेळा नोटीसा दिल्या गेल्या. वीज देयकांची थकबाकी वसूल करताना हे ग्राहक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचे. या ग्राहकांवर यापूर्वीही कारवाई केली गेली होती आणि त्यानुसार विद्युत पुरवठा खंडित केला गेला होता. विद्युत मीटर त्या ठिकाणावरून काढून टाकण्यात आले होते. जुलै २०१९ मध्येही पोलिसांची मदत घेऊन वीज-तोडणी मोहीम राबविण्यात आली होती असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.