सोसायटीत विनाकारण फिरल्यास अध्यक्ष-सचिवांवर फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:59 AM2020-04-28T00:59:52+5:302020-04-28T01:00:06+5:30
यापुढे कोणालाही इमारतीच्या गच्चीवर, कॉमन एरिया, पार्किंगच्या भागात एकत्रित येता येणार नाही.
ठाणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ठाण्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाकडून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरूआहेत. याचाच एक भाग म्हणून आता महापालिकेने शहरातील सर्व हाऊसिंग सोसायट्यांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार यापुढे कोणालाही इमारतीच्या गच्चीवर, कॉमन एरिया, पार्किंगच्या भागात एकत्रित येता येणार नाही. असे प्रकार आढळले तर संबंधित सोसायटीच्या अध्यक्ष तसेच सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील असे, महापालिकेने स्पष्ट केले.
ही नियमावली महापालिकने शहरातील प्रत्येक सोसायटींना धाडली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक सोसायटीने काय करावे, काय करूनये याचे नियम सांगितले आहेत. त्यानुसार प्रत्येक सोसायटीचा अध्यक्ष आणि सचिव यांनी कोरोनाच्या दृष्टीने नियमावली तयार करून ती सोसायटीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. यात सोसायटीच्या कॉमन एरिया, पार्किंग व अन्य पेसेजमध्ये मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकसाठी कुणी जाऊ नये, सोसायटी आवारात विनाकारण फिरू नये, तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये याची काळजी घ्यावी, असेही नमूद केले आहे. सोसायटीच्या एखाद्या सदस्यानेदेखील या नियमावलीकडे दुर्लक्ष केले तर त्याच्यावर सुरुवातीला दंडात्मक कारवाई करावी, त्यानंतरही तो ऐकत नसेल तर त्याच्याविरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. सोसायटीमध्ये असलेल्या दुकाने, नर्सिंग होम, दवाखाने, औषध दुकाने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सोसायटीमधील एखादा नागरिक कोरोनाबाधित आढळला तर त्याच्या घरच्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये, असेही या नियमावलीत स्पष्ट केले आहे.