सलग दोन महिने गैरहजर राहणाऱ्या आरटीओ लिपिकाविरुद्ध फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 12:10 AM2020-06-08T00:10:10+5:302020-06-08T00:14:39+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी संख्या कमी करण्यात आली होती. ती आता वाढविण्यात आली आहे. परंतू, सलग दोन महिने कामावर गैरहजर राहणा-या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सचिन तायडे या लिपीकाविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन महिने कामावर गैरहजर राहणाºया ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सचिन तायडे या लिपीकाविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी संख्या कमी करण्यात आली होती. ती आता वाढविण्यात आली आहे. परंतू, गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही कर्मचारी हे विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळले आहे. ठाण्यासारख्या कोरोनाची वाढती संख्या असलेल्या शहरात अत्यावश्यक सेवांची वाहने तपासण्याची जबाबदारी आरटीओ कार्यालयावर आहे. तरीही २१ मार्च ते १७ मे २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये तायडे हे अमरावती येथील गावी गेले. त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. तरी त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. याच संदर्भात चौकशीत ते दोषी आढळल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५६ नुसार त्यांच्याविरुद्ध सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. व्ही. डोके यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तायडे हे शासकीय सेवक असूनही त्यांनी कोरोनासारख्या साथीच्या आजाराबाबतची अत्यावश्यक सेवा बजावण्याऐवजी कोणतीही लेखी परवानगी न घेता ते सलग दोन महिने गैरहजर राहिल्याबद्दल हा गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.