सोयाबीनची दलाली करणाऱ्यांवर गुन्हे दाखल - सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 10:11 PM2017-10-30T22:11:00+5:302017-10-30T22:11:04+5:30
सोयबीनचे पीक राज्यांत मोठ्या प्रमाणात झाले असुन त्याच्या विक्री संदर्भात दलाली होत असल्याचे माझ्याही कानावर आले आहे.
डोंबिवली - सोयबीनचे पीक राज्यांत मोठ्या प्रमाणात झाले असुन त्याच्या विक्री संदर्भात दलाली होत असल्याचे माझ्याही कानावर आले आहे. अशा दलालांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रसंगी त्यांच्यावर गुन्हेही दाखल करु असे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी डोंबिवलीतल्या शेतीविषयक प्रदर्शनाला भेट देण्या प्रसंगी केले. राज्यांत सोयाबिन उत्पादकांसाठी १२१ विक्री केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी अशा केंद्रावरच त्यांचा माल वितरित करावा असे आवाहन खोत यांनी केले. कोणत्याही शेतकर्याचा विज पुरवठा खंडीत केला जाणार नाही, पण राज्य शासनाने आवाहन केल्यानुसार निव्वळ वीज बिल पाच टप्प्यांत भरावे,त्यातही त्यांना अडचणी भेडसावल्यास त्यांनी संबंधित ठिकाणच्या महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधावा त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले.
ज्या ठिकाणी पावसाच्या शेवटच्या टप्प्यात ६५ मिली पेक्षा जास्त पाऊस झाल्याने.शेतीचे नुकसान झाले असल्यास त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते पण त्या ठिकाणच्या जिल्हाधिकार्यांनी संबंधितांचे पंचनामे करणे आवश्यक आहे.त्यानंतरच आलेल्या अंतिम यादीवरुन नुकसानभरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात येईल असही ते म्हणाले..यावेळी वनराईचे आयोजक नगरसेवक महेश पाटील उपस्थित होते.