उसनवारीचे दोन लाख रुपये परत न केल्याने न्यायालयामार्फत फसवणूकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 11:37 PM2017-11-21T23:37:33+5:302017-11-21T23:37:55+5:30
ठाणे: सुमारे १२ वर्षापूर्वी हात उसने घेतलेले दोन लाख रुपये परत करण्याऐवजी टाळाटाळ करीत फसवणूक करणा-या गणेश विष्णू देसाई (रा. घाटकोपर, मुंबई) याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
देसाई याचा मूर्ती बनवून त्या विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याने व्यावसायासाठी ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील रहिवाशी विद्वेश्वर कदम यांच्याकडून दोन लाख रुपये २००४-०५ मध्ये हात उसने घेतले होते. पैसे परत करतो, असे सांगून २०१० मध्ये पसार झाला. नंतर अचानक २०१५ मध्ये पुन्हा तो भेटल्यानंतर घाटकोपर येथील पंतनगर पोलीस ठाण्यात याबाबत कदम यांनी तक्रार अर्ज दाखल केला. प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिथेच त्याने समझोता करण्याची भूमीका घेतली. अगदी पैसे परत करण्याचेही कबूल केले. त्यामुळे तिथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाच नाही. त्यानंतर साडे सहा वर्ष उलटूनही त्याने पैसे न दिल्याने अखेर कदम यांनी ठाण्याच्या दिवाणी न्यायालयात याप्रकरणी खासगी तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश वर्तकनगर पोलिसांना दिले. त्यानुसार सोमवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.