गुन्हेगारीच्या पोलिसांना बेड्या
By admin | Published: January 9, 2016 01:59 AM2016-01-09T01:59:45+5:302016-01-09T01:59:45+5:30
दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनचोऱ्या , घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात कल्याण-डोंबिवलीतील पोलीस
आकाश गायकवाड, डोंबिवली
दरोडे, सोनसाखळी चोऱ्या, वाहनचोऱ्या , घरफोड्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असून या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात कल्याण-डोंबिवलीतील पोलीस अपयशी ठरल्याचे सद्य:स्थितीवरून दिसत आहे. गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखामुळे नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांची लोकसंख्या सुमारे १५ लाख आहे. या दोन्ही शहरांच्या कार्यक्षेत्रांत आठ पोलीस ठाणी आहेत. यात महात्मा फुले, बाजारपेठ, खडकपाडा, कोळसेवाडी, रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर, मानपाडा यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोड्या आणि सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या क्षेत्रांत विविध ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू असूनदेखील चोर आपले ईप्सित साध्य करण्यात यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचे प्रमाण सध्या आहे त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येनुसार काही पोलीस ठाण्यांची हद्द मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. परिस्थितीवर देखरेख किंवा येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तोकडे पोलीस दल आणि दिवसागणिक गुन्ह्यांचा वाढता आलेख याचा पोलिसांवर विलक्षण ताण पडत असल्याचे दिसते. कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि डोंबिवलीमधील मानपाडा पोलीस ठाणे ही त्याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करताना पोलिसांनाही मनुष्यबळाबरोबरच साधनसामग्रीच्या तुटवड्यालाही तोंड द्यावे लागत आहे. वाहनांची अपुरी संख्या हेही वाढत्या गुन्ह्यांमधील एक महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकसंख्या कल्याण-डोंबिवलीच्या आसपास राहण्यासाठी आली आहे. येथील मोठी गृहसंकुले बहुतांशी शहराच्या बाहेर किंवा एका टोकाला बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी एखादा गुन्हा किंवा घटना घडल्यास घटनास्थळी पोहोचायला पोलिसांचा मोठा अवधी खर्ची पडत आहे. मुळातच अपुरे संख्याबळ आणि वाढती लोकसंख्या या दोन प्रमुख कारणांमुळे पोलीस दलासमोरील गुन्हे रोखण्याचे आव्हान अधिकच खडतर बनले आहे. अशा वेळी शहरात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा सवाल शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत. तर, शासन अशी एखादी मोठी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहत आहे का? ठेच लागल्यानंतरच सरकारला शहाणपण येणे जरु री आहे का, असे सवाल उपस्थित होत आहेत.