ठाण्यात सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्यांचे यूपीच्या आग्य्रातही गुन्हेगारी रेकॉर्ड; ११ गुन्ह्यांची उकल
By जितेंद्र कालेकर | Published: July 17, 2024 08:48 PM2024-07-17T20:48:23+5:302024-07-17T20:48:47+5:30
ठाण्यात घेतले भाड्याने घर; ठाणे, कल्याणमधील गुन्ह्यांचा लागला छडा
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे शहर परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या आशिष सिंग (३३, रा. दोस्ती, वर्तकनगर, ठाणे) याच्यासह तीन आरोपींविरोधात उत्तर प्रदेशातील आग्रा येथेही गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गोडे यांनी बुधवारी दिली. या आरोपींकडून आतापर्यंत जबरी चोरीचे ११ गुन्हे उघड झाले आहेत.
ठाण्याच्या चितळसर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अमित सिंग, रोहित सिंग आणि आशिष सिंग या तिघांना चितळसर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही दिवसांपूर्वी अटक केली होती. यामध्ये सतत तीन दिवस आणि रात्र सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली होती. त्यानंतर आरोपी वास्तव्याला असलेल्या वर्तकनगरच्या दोस्ती, कोरस टॉवर परिसरात सापळा लावून पोलिसांनी आशिष याला अटक केली होती. सखोल चौकशीत त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ठाणे आणि कल्याण परिसरात चोरीचे गुन्हे केल्याची बाब चौकशीत उघड झाली होती.
त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली. सुरुवातीला त्यांच्याकडून २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. सखोल चौकशीत त्यांच्याकडून ११ गुन्ह्यांची उकल झाली असून, त्यातून १२२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या त्रिकुटाची उत्तर प्रदेशातील आग्रा भागातही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्यांनी त्या भागातही जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. त्या भागातील पोलिसही त्यांच्या मागावर असताना, त्यांनी ठाण्यात वर्तकनगर भागात येऊन एका भाड्याच्या खोलीत आसरा घेतला. त्यानंतर ठाणे, कल्याण परिसरातही असेच जबरी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता चितळसर पोलिसांनी वर्तवली आहे.