बोगस पटसंख्या नोंदवणाऱ्या शाळांवर फौजदारी , शिक्षक-मुख्याध्यापक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 04:25 AM2018-07-30T04:25:40+5:302018-07-30T04:25:50+5:30
सात वर्षांपूर्वी झालेल्या शाळांच्या पटपडताळणीमध्ये जिल्ह्यात बोगस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळले होते. ही बोगस पटसंख्या नोंदवणा-या शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह संबंधित कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.
- सुरेश लोखंडे
ठाणे : सात वर्षांपूर्वी झालेल्या शाळांच्या पटपडताळणीमध्ये जिल्ह्यात बोगस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळले होते. ही बोगस पटसंख्या नोंदवणा-या शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह संबंधित कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित शाळांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील सातहजार शाळांची शालेय पटपडताळणीची सत्यता सात वर्षांपूर्वी सलग तीन दिवस तपासण्यात आली होती. त्यासाठी महसूल विभागाची मदत घेण्यात आली होती. यामध्ये पाच हजार ७१८ प्राथमिक शाळा आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवलेल्या शैक्षणिक संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींवर आता फौजदारी कारवाई करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी शिक्षण संचालकांनी परिपत्रक जारी केल्यामुळे संबंधित शाळांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांची दैनंदिन पटपडताळणी ठाणे जिल्ह्यात झाली. यामध्ये १५ तालुके, सात महानगरपालिका आणि पाच नगरपालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची पडताळणी जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील महसूल विभागाने केली. तीन दिवसांच्या या पडताळणीमध्ये वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांच्या बोटांना तीन हजार ६०० बॉटलमधील शाई लावण्यात आली. मतदानासाठी वापरण्यात येणारी ही शाई खास म्हैसूर येथून मागण्यात आली होती. या विद्यार्थी पटनोंदणीमध्ये सुमारे एक कोटी २५ लाख रुपये खर्च झाले. एक हजार ५५५ अधिकाºयांच्या ३० पथकांद्वारे ही पडताळणी करण्यात आली. राज्याच्या शिक्षण विभागाने या तपासणीसाठी गठीत केलेल्या पथकांमध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आदी जबाबदार अधिकाºयांचा समावेश होता. पटनोंदणी पडताळणीसाठी जिल्ह्यांतर्गत व जिल्ह्याबाहेरून विद्यार्थी वाहतुकीवरदेखील अंकुश लावण्यात आला होता. त्यामुळे शाळांमध्ये बोगस विद्यार्थ्यांची उपस्थिती रोखण्यास मदत झाली. बोगस पटनोंदणीतून शासनाची फसवणूक करणाºया शाळांवर आता कोणत्याही क्षणी फौजदारी कारवाई होण्याचे संकेत आहेत.
सलग तीन दिवस तपासणी
ठाणे जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांमधील सुमारे २० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांची शालेय पटपडताळणीची सत्यता सात वर्षांपूर्वी सलग तीन दिवस तपासण्यात आली होती. त्यासाठी महसूल विभागाची मदत घेण्यात आली होती. यामध्ये पाच हजार ७१८ प्राथमिक शाळा आहेत
यातील तीन हजार ५७९ शाळा ठाणे जिल्हा परिषदेच्या आहेत. याशिवाय, एक हजार ५८२ माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि आश्रमशाळांचाही समावेश आहे. त्यापैकी ५७६ शाळा अनुदानित आहेत. उर्वरित शाळा विनाअनुदानित असून तेथील विद्यार्थी पटसंख्याही बोगस आहे.