नगरसेवकांसह समर्थकांवर गुन्हे, २४ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 02:56 AM2018-09-12T02:56:35+5:302018-09-12T02:56:49+5:30
मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली.
कल्याण : मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारी केडीएमसीच्या महासभेत शाब्दिक चकमक झाली. यावेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांनी थेट सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही नगरसेवकांसह त्यांच्या ३४ समर्थकांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी २४ जणांना अटक केली असून, कल्याण न्यायालयाने मंगळवारी त्यांना १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी महासभेत पुलाचा मुद्दा मांडला, त्यावेळी शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी पुलाविषयी माहिती देत होते. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी त्यावर हरकत घेतली. दीपेश यांच्या शेजारी बसलेले त्यांचे भाऊ, नगरसेवक जयेश यांनी दीपेशला बोलू द्या, हरकत घेण्याचा विषय नाही, असे सांगितले. यावरून जयेश आणि रमेश म्हात्रे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोन्ही नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी दीपेश आणि रमेश म्हात्रे यांनी दिलेल्या चिथावणीमुळे त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. समर्थकांंनी दमदाटी, धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून महासभेचे कामकाज बंद पाडले. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मल्लीनाथ डोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यासह ३४ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करून २४ जणांना अटक केली.
>गेल्यावर्षीही झाला होता असाच वाद
मार्च २०१७ मध्ये केडीएमसीच्या महासभेत अशीच घटना घडली होती. त्यावेळी महासभा सुरु असताना शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि भाजपाचे सहयोगी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड वाद झाला होता. त्यांच्यातील वाद विकोपाला जाऊ नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता.