दिव्यांगांनी दिला जेलभरो आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:35+5:302021-04-30T04:50:35+5:30
ठाणे : मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ती पूर्ण केली जात नाही. त्यामुळे ...
ठाणे : मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ती पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसांत दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे मोहम्मद युसूफ खान यांनी ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मागील वर्षी २३ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यापासून आजतागायत दिव्यांगाना त्यांच्या स्टॉलवर स्टेशनरी, झेरॉक्स यासारख्या वस्तूंची विक्री त्या जीवनावश्यक श्रेणीमध्ये येत नसल्याने बंद करण्याचे आदेश आहेत. परिणामी, दिव्यांगांच्या घरात एकवेळचे अन्न शिजणेदेखील जिकिरीचे झाले आहे. २०२० मध्ये दिव्यांगांना अर्थसाह्य करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले होते. त्यावेळी सुमारे १० हजार लोकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, तेव्हापासून आजतागायत कोणत्याही प्रकारचे अर्थसाह्य देण्यात आलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.