जिल्ह्यात दुबार भात लागवडीचे संकट टळले
By Admin | Published: July 21, 2015 04:48 AM2015-07-21T04:48:55+5:302015-07-21T04:48:55+5:30
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे
सुरेश लोखंडे, ठाणे
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे अद्याप लागवड होऊ शकली नाही. परंतु मागील दोन दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे संभाव्य दुबार पेरणी व रिक्त क्षेत्रातील भात लागवड न होण्याचे संकट टळल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे.
रविवारच्या मध्यरात्रीपासून ठाणेसह पालघर जिल्ह्यात पावसाने संततधार धरली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४३१४.७४ मिमी पाऊस पडला आहे. ठाणेशहर परिसरात दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंतही जोरदारपणे पडला. याशिवाय कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ, भिवंडी तालुक्यातही या पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ६१६ मिमी या पावसाची नोंद झाली आहे.
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११३९ मिमी पाऊस पडला असून सरासरी १४२ मिमी नोंद झाली आहे. सोमवारीही पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी आदिवासी भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे या जिल्ह्यातील दुबार पेरणीचे संकट काही अंशी टळल्याचे शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले.
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात एक लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे पीक घेतले जाणार आहे. यापैकी एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली असून उर्वरित नागली, १५ हजार ९०५ हेक्टरवर तर वरी सुमारे ११ हजार ३२० हेक्टवर आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर भात लागवड होते.
या वर्षी हेक्टरी २५०० क्ंिवटल भात उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसह दोन्ही जिल्हह्यातील कृषी विभागाने कंबर कसली आहे. ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर करण्याचे नियोजन जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. याशिवाय बियाणे जया, रत्ना, विजेता, रूपाली, सह्याद्री आदी भाताचे सुमारे २३ हजार ५२९ क्विंटल बियाणे वापरण्यात आले आहे.
त्यापैकी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ६३७ पैकी १० हजार ९८६ क्विंटल बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. तर चार हजार ७०० मेट्रीक टन खताचा पुरवठा झाल्याचे ठाणे जिपचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले. पावसामुळे शेतकरी बांधवांत समाधानाचे वातावरण आहे.