नगरसेवकांच्या भूमिकेवर संघर्ष समितीची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:28 AM2020-02-21T01:28:17+5:302020-02-21T01:28:29+5:30

केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा : चार वर्षांत प्रभागांमध्ये किती विकासकामे केली?

Criticism of conflict committee on the role of councilors | नगरसेवकांच्या भूमिकेवर संघर्ष समितीची टीका

नगरसेवकांच्या भूमिकेवर संघर्ष समितीची टीका

Next

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळू नका. स्वतंत्र नगरपालिकेची गरज नाही, अशी भूमिका २७ गावांतील नगरसेवकांनी घेतल्याने त्यांच्या या भूमिकेविषयी सर्वपक्षीय संघर्ष समितीने तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे. नगरसेवकांनी चार वर्षांत त्यांच्या प्रभागांत किती विकासकामे केली, असा खोचक सवाल समितीचे सचिव नरेश पाटील यांनी केला आहे.

केडीएमसीच्या २०१५ च्या निवडणुकीत नगरसेवक हे संघर्ष समितीच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावे महापालिकेतून वगळणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी भाजप, संघर्ष समिती, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका व्यासपीठावर होते. शिवसेना सोडून सगळ्यांचा स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस पाठिंबा होता. आजही आहे. आजच्या घडीला महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी गावे वगळण्याच्या मागणीला विरोध असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. तरीदेखील काही नगरसेवक २०१७ मध्ये फडवणीस यांना दिलेल्या पत्राचा आधार घेत सर्वच नगरसेवकांचा गावे वगळण्यास विरोध असल्याचे सांगत आहेत. मात्र, हे पत्र जुने असल्याने गावे वगळण्यास आमचा विरोध नाही, असे काही नगरसेवकांनी संघर्ष समितीशी संपर्क करून सांगितले.
प्रत्यक्षात, यासंदर्भात पुन्हा नगरसेवकांकडे विचारणा केली की, जुन्या पत्राचा संदर्भ दिला जात आहे. त्यावेळी त्यांनी नव्या पत्राचा दाखला दिला. मात्र, नव्या पत्राच्या शेवटच्या पानावर सात सदस्यांचीच स्वाक्षरी असल्याचे पाहावयास मिळाले.
त्याचबरोबर विरोध करणारे भाजप नगरसेवक हे सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी राज्यमंत्री व डोंबिवलीचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आहेत का, असा सवाल केला आहे. तसेच शिवसेनेचे सदस्य त्यांच्या नेतृत्वाविरोधात ही मागणी करीत आहे का, असा दुहेरी प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.
विरोध करणाऱ्या काही सदस्यांनी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सगळेच सदस्य हे स्वतंत्र नगरपालिकेच्या विरोधात आहेत. मात्र, त्यांच्यावर काही लोक दबाब टाकत असल्याने त्यांच्याकडून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीचा नकार दर्शविला जात आहे.
यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, ‘स्वतंत्र नगरपालिकेच्या मुद्यावर मनसे पूर्वीपासून ठाम होती. शिवसेना आता या मागणीसंदर्भात राजकारण खेळत आहे. त्यामुळेच काही सदस्य स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीस विरोध करीत आहेत.’

स्वतंत्र नगरपालिकाच हिताची-पाटील
संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ‘स्वतंत्र नगरपालिकेची मागणी ही २७ गावांच्या हिताची आहे. तिला जनसमर्थन मिळत असताना जनहिताच्या विरोधात बरळणे म्हणजे हा कोडगेपणा आहे. या सगळ्या मुद्यावरून स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीवरून नगरसेवक व संघर्ष समिती तसेच विविध राजकीय पक्ष यांच्यात दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहेत.’

Web Title: Criticism of conflict committee on the role of councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.