रेल्वे प्रशासन, खासदारांवर टीकेची झोड

By admin | Published: May 22, 2017 01:53 AM2017-05-22T01:53:53+5:302017-05-22T01:53:53+5:30

रेल्वे मंत्रालयाने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्त संस्थेकडून केलेल्या देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात ठाणे स्थानकाची ३२६

The criticism of railway administration and MPs | रेल्वे प्रशासन, खासदारांवर टीकेची झोड

रेल्वे प्रशासन, खासदारांवर टीकेची झोड

Next

लोकमत न्यूट नेटवर्क
डोंबिवली : रेल्वे मंत्रालयाने ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्त संस्थेकडून केलेल्या देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्वच्छता सर्वेक्षण अहवालात ठाणे स्थानकाची ३२६ व्या तर कल्याणची ३०२ क्रमांकावर घसरण झाली आहे. स्थानकांतील अस्वच्छतेबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाबरोबर ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. खासदारांनी केवळ विविध सेवा-सुविधांच्या उद्घाटनांवरच भर दिला. पण स्वच्छता आणि प्रवाशांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
डोंबिवली स्थानकाची डॉ. शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. स्वच्छतागृह बंद असल्याने नाराजी व्यक्त केली. पण हे सगळे आधी केले असते तर बरे झाले असते. केवळ प्रसिद्धीचा स्टंट म्हणून त्यांनी तातडीने पाहणी केली, हे योग्य नाही. किती वेळा आणि का प्रवाशांच्या अपेक्षांवर पाणी फिरवणार?, असा सवाल नाराज प्रवाशांनी केला. कळवा ते अंबरनाथ आणि टिटवाळापर्यंतच्या स्थानकांचा अभ्यास केल्यास केवळ ठाणे आणि कल्याणच नव्हे तर सगळीच स्थानके बकाल असल्याचे स्पष्ट होईल, असेही प्रवासी म्हणाले. रेल्वे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यानेच प्रत्येक ठिकाणी घसरण होत चालल्याची टीका वास्तूविशारद राजीव तायशेटे यांनी केली.
रेल्वे स्थानक परिसरात कोणीही येतो कुठेही थुंकतो, कचरा टाकतो, लघुशंका करता, हे योग्य नाही. यामुळे केवळ रेल्वे प्रशासनाचीच नव्हे तर तेथील लोकप्रतिनिधींची किंमत केली जाते. सातत्याने रेल्वे स्थानकांचा दौरा करणे, प्रवाशांच्या अपेक्षा जाणणे हे आवश्यक आहे. पण तसे कधी होत नाही, असे तायशेटे म्हणाले.
ठाणे आणि कल्याण ही दोन्ही स्थानके अत्यंत महत्त्वाची आहेत. या स्थानकात लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून हजारो प्रवासी येतात. या रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेशी त्यांना सामाना करावा लागतो. त्यामुळे अस्वच्छतेबाबत ते देशभर नाराजी व्यक्त करतात. परिणामी आपल्या शहरांचीच बदनामी होते. त्याचे दुरगामी परिणाम होतात. याचा निदान यानंतर तरी गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अशा अनेक बाबींमुळे प्रवासी नाराज असतात. निदान त्यांचे म्हणणे ऐकावे आणि बदल केल्यास परिवर्तन नक्की घडेल. पण हे कोणीही लक्षात का घेत नाही, असा सवाल प्रवाशांनी केला.
आघाडी सरकारच्या काळात ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक आणि कल्याणचे माजी खासदार आनंद परांजपे हे सातत्याने ‘खासदार आपल्या दारी’ या उपक्रमातून प्रवाशांची भेट घेत. प्रवाशांकडून ते एक फॉर्म भरून घ्यायचे, त्याचा अभ्यास केला जायचा. स्थानकानुसार त्याची वर्गवारी केली जायची. संबंधित स्थानक प्रबंधकांना त्याबाबातची माहिती दिली जायची. संबंधित सुधारणा तातडीने व्हायच्या. त्या न केल्यास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली जात असे. पण मागील दोन वर्षांत तसा कोणताही उपक्रम राबवला गेल्याचे स्मरणात नसल्याची बोचरी टीका विविध ठिकाणच्या प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Web Title: The criticism of railway administration and MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.