महात्मा गांधी यांच्यावर टीका करणे भिडे यांच्या वयाला शोभत नाही- रामदास आठवले
By सदानंद नाईक | Published: July 30, 2023 09:23 PM2023-07-30T21:23:49+5:302023-07-30T21:24:00+5:30
संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची रामदास आठवलेंची मागणी.
उल्हासनगर : एका खाजगी कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी शहरात आलेले केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीवरील टीकेचा समाचार घेतला. भिडे यांच्या वयाला गांधींवर टीका करणे शोभत नसून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले.
उल्हासनगर कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरात राहणारे आंबेडकरीवादी व मुरबाड येथील आंबेटेम्भे मधील भिमाई स्मारक समितीचे अध्यक्ष दादासाहेब खरे यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. दिवंगत खरे यांच्या जलदानविधीच्या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री रामदास आठवले शहरात आले होते. त्यावेळी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या टिकेबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी भिडे यांच्या वादग्रस्त टीकेचा चांगलाच समाचार घेतला. भिडे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करीत असून त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी.
महात्मा गांधी हे स्वातंत्र्य सैनिक असून त्यांनी दिलेल्या इंग्रजा विरोधातील लढ्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा आपण निषेध करीत असून त्यांच्या वक्तव्याने समाजा समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगलीत राहणारे संभाजी भिडे यांच्यावर सरकारने कारवाई करावी. अशी मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचें आठवले म्हणाले. आठवले यांना भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. आमदार बालाजी किणीकर हेही यावेळी उपस्थित होते.