केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या खासगीकरण धोरणांविरोधात सीआरएमएसचे उद्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 05:35 PM2018-02-19T17:35:00+5:302018-02-19T17:35:18+5:30
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची इमारत हेरिटेज दर्जाच्या नावाखाली तात्काळ रिकामी करून त्या जागी वस्तुसंग्रहालय उभारण्याचा घाट घातला जाणार आहे.
डोंबिवली: केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची इमारत हेरिटेज दर्जाच्या नावाखाली तात्काळ रिकामी करून त्या जागी वस्तुसंग्रहालय उभारण्याचा घाट घातला जाणार आहे. तशी आॅर्डर देखील रेल्वे बोर्डाने काढली आहे. सध्या मुंबईत जीएम बिल्डिंगमध्ये वस्तुसंग्रहालय आहे, तेथे अभावानेच पर्यटक जातात. अन्य प्रवासी केवळ फोटोसेशन करतात. त्यातच आता तेथे शेकडो रेल्वे कर्मचारी, अधिकारी आदींचा वावर असल्याने त्या इमारतीची वेळच्या वेळी देखभाल केली जात आहे. त्यामुळे ती इमारत जैसे थे ठेवावी असा पवित्रा घेत त्या मागणीसाठी महाव्यवस्थापक कार्यालयावर मंगळवारी सकाळी ११ वाजता सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
परेल वर्कशॉप रिकामे करायचे, कुर्ला येथील रेल्वेची वसाहत रिकामी करायची हा प्रकार न समजण्यासारखा असून बिल्डरांच्या घशात या जमिनी देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय असल्याने त्याचाही निषेध करण्यात येणार आहे. मजदूर संघाचे सुनील बेंडाळे(कल्याण), डॉ. प्रवीण बाजपेयी(मुंबई) आदींनी मंगळवारच्या मोर्चा संदर्भात लोकमतला माहिती दिली. ते म्हणाले की, सातत्याने विविध प्रस्तावांच्या माध्यमाने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दृष्टीने वाटचाल करणे हे केंद्रातील रेल्वे मंत्रालयांचे कार्य दिसते. या ठिकाणी दोन-चार भेटीत त्यांनी महाव्यवस्थापकांच्या वास्तूमध्ये ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय निर्माण करण्याचा चंग बांधला, पण ती जागा संग्रहालयासाठी पुरेशी नाही. त्यासाठी अन्यत्र जागा निवडावी आम्ही त्यांचे समर्थन करू. पण वस्तुसंग्रहालयाच्या नावाखाली भविष्यात हॉटेल देखिल उघडले जाऊ शकते असे नियोजन असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
बेंडाळे म्हणाले की, खासगीकरणाच्या दिशेने रेल्वे कर्मचा-यांचा बळी दिला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. रेल्वे मंत्रालयाच्या मनमानी कारभाराचा सीआरएमएस निषेध करत असून त्यांचे हे डाव उधळून लावले जातील असेही ते म्हणाले. वाजपेयी म्हणाले की, मंगळवारच्या मोर्चाला युनियनसह कुर्ला व परेल येथिल रेल्वेचे सुमारे तीन हजार कर्मचारी आंदोलनाला सहभागी होतील. त्या सगळयांचे नेतृत्व सीआरएमस मुंबई मंडल, ठाणे व कल्याण भागातील पदाधिकारी करणार आहेत. हा मोर्चा झाल्यानंतर आगामी काळात दिल्लीमध्ये रेल्वे मंत्रालयावरही मोर्चा काढणे, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जीएम बिल्डिंगचे म्युझियममध्ये रुपांतर करण्याचा निर्णय ज्या समितीने घेतला आहे त्यांचा प्रामुख्याने निषेध करण्यात येणार असून त्यांच्या निर्णयाला विरोध करणे हा मोर्चाचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.