करोडपती उमेदवारांचा बोलबाला!

By admin | Published: May 21, 2017 03:22 AM2017-05-21T03:22:10+5:302017-05-21T03:22:10+5:30

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात यावेळी करोडपती उमेदवारांचा बोलबाला आहे. महापालिका प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या ४५१ पैकी ११८ उमेदवार

Crorepati candidates dominate! | करोडपती उमेदवारांचा बोलबाला!

करोडपती उमेदवारांचा बोलबाला!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : भिवंडी निजामपूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात यावेळी करोडपती उमेदवारांचा बोलबाला आहे. महापालिका प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या ४५१ पैकी ११८ उमेदवार करोडपती असून, त्यापैकी सर्वाधिक उमेदवार कोणार्क विकास आघाडीचे आहेत.
२४ मे रोजी होणाऱ्या भिवंडी महापालिकेच्या ९0 जागांसाठी ४५८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नवी दिल्ली येथील असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेने ४५८ पैकी ४५१ उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, ४५१ पैकी २६ टक्के म्हणजे ११८ उमेदवार करोडपती आहेत. कोणार्क विकास आघाडीचे १६ पैकी १0 उमेदवार करोडपती आहेत. हे प्रमाण ६३ टक्के आहे. त्याखालोखाल शिवसेनेचे ५१ टक्के उमेदवार करोडपती आहेत. या पक्षाचे ५५ पैकी २८ उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये हे प्रमाण जवळपास सारखे आहे. भाजपचे ३२ आणि काँग्रेसचे ३0 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. भाजपचे ५६ पैकी १८ तर काँग्रेसचे ६४ पैकी १९ उमेदवार कोट्यधीश आहेत. एमआयएमचे ९ पैकी २ अर्थात २२ टक्के, तर रिपाइं (एकतावादी) चे ५ पैकी १ अर्थात २0 टक्के उमेदवार करोडपती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये हे प्रमाण सारखे आहे. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी १९ टक्के उमेदवार करोडपती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ३२ पैकी ६ आणि समाजवादी पक्षाचे ३१ पैकी ६ उमेदवार करोडपती आहेत. अपक्षांमध्ये हे प्रमाण १७ टक्के आहे. १६२ अपक्षांपैकी २८ उमेदवार करोडपती आहेत. सर्व उमेदवारांच्या जाहीर संपत्तीची सरासरी १.७0 कोटी रुपये आहे.

टॉप टेन उमेदवार : सर्वाधिक श्रीमंत असलेल्या पहिल्या दहा उमेदवारांमध्ये सेनेचे दोन, तर भाजप, कोणार्क विकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार प्रत्येकी दोन आहेत. प्रभाग क्र. १३ मध्ये उभे असलेले सेनेचे उमेदवार बाळाराम चौधरी यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांची चल-अचल संपत्ती ५0 कोटी १0 लाख ६३ हजार ७५६ रुपयांची आहे. त्याखालोखाल अपक्ष उमेदवार नाविद हसन मोमीन यांनी ५0 कोटी ९0 हजार रुपयांची चल-अचल संपत्ती जाहीर केली आहे.

शिवसेनेच्या अलका चौधरी यांनी सुमारे २६ कोटी, कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील आणि प्रतिभा पाटील यांनी प्रत्येकी सुमारे २२ कोटी, भाजपाचे नित्यानंद नाडर यांनी सुमारे २२ कोटी आणि हनुमान चौधरी यांनी १५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. शिवसेनेचे नारायण चौधरी यांनी सुमारे १९ कोटी आणि अस्मिता नाईक यांनी सुमारे १८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. अपक्ष उमेदवार राजेश म्हात्रे यांनीही सुमारे १८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

Web Title: Crorepati candidates dominate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.