ठाण्यात गुंतवणूकदारांना कोटीचा गंडा; क्रेडिट सोसायटीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:44 AM2020-01-16T00:44:54+5:302020-01-16T00:45:06+5:30
एप्रिल २०१९ नंतर शेट्टी यांनी पैसे गोळा करणे बंद केले. राय यांनी विचारणा केल्यानंतर अध्यक्ष पैशांची व्यवस्था करण्यासाठी मंगलोरला गेल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे : जादा परताव्याचे आमिष दाखवून ठाण्यातील सुमारे ८२ गुंतवणूकदारांची एक कोटी १५ लाख ७० हजार ३५० रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘समानी को-आॅपरेटिव्ह सोसायटी’ या सहकारी पतपेढीचे अध्यक्ष रविराज समानी आणि एजंट अशोक शेट्टी यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील बाळकुम येथील ‘साईनाथ कृपा’ इमारतीमध्ये रविराज समानी यांनी ही क्रेडिट सोसायटी सुरू केली. त्यांनी भिवंडीतील ट्रा्रन्सपोर्ट व्यावसायिक प्रवीण राय यांच्यासह अनेकांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून या पतसंस्थेत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१९ या कालावधीमध्ये राय यांच्याकडून पाच लाख ६४ हजार रुपये आणि ज्ञानेश्वर रणपिसे यांच्याकडून एक लाख ५७ हजार तसेच अन्य गुंतवणूकदारांसह सुमारे ८२ जणांची त्यांनी वेगवेगळ्या योजनांमध्ये एक कोटी १५ लाख रुपये गुंतवणूक केली. राय यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून समानी सोसायटीविषयी त्यांना माहिती मिळाली होती. सोसायटीचे अध्यक्ष रविराज आणि एजंट अशोक शेट्टी यांनी ठेवीच्या वेगवेगळ्या योजनांविषयी माहिती त्यांना दिली. मुदतठेवीवर १४ टक्के व्याज तसेच इतरही ठेवीवर चांगले आकर्षक व्याज देण्याचे त्यांना आमिष दाखविण्यात आले.
समिती पाहणी करूनच देणार एनओसी
एप्रिल २०१९ नंतर शेट्टी यांनी पैसे गोळा करणे बंद केले. राय यांनी विचारणा केल्यानंतर अध्यक्ष पैशांची व्यवस्था करण्यासाठी मंगलोरला गेल्याचे त्यांनी सांगितले. राय यांनी पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना काही धनादेश देण्यात आले होते. परंतु, ते वटले गेले नाहीत. सोसायटीचे कार्यालयदेखील बंद आढळल्याने राय यांच्यासह ८२ गुंतवणूकदारांनी एमपीआयडी कायद्याखाली कापूरबावडी पोलीस ठाण्यात १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.