संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ठाण्यात जमाव बंदी आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: June 28, 2024 08:30 PM2024-06-28T20:30:21+5:302024-06-28T20:31:17+5:30
गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची राहणार करडी नजर: झेरॉक्सची दुकानेही राहणार बंद
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या ७ जुलै रोजी ठाण्यातील पाच उपक्रेद्रांवर संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (इपीएफओ) दोन सत्रांमध्ये होणार आहे. देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट परीक्षेतील तसेच इतर परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमाव बंदी लागू केली असून या काळात परिसरातील झेरॉक्स दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी शुक्रवारी काढले आहेत.
आपल्या आदेशामध्ये पोलिस उपायुक्त गोरे यांनी म्हटले आहे की, येत्या ७ जुलै रोजी ठाण्यातील पाच उपकेेंद्रावर ही संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा दोन सत्रांमध्ये हाेणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी परीक्षेदरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमून गैरप्रकार झाल्याच्या तसेच परीक्षेत व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात हा मनाई आदेश लागू केला आहे. या परीक्षेच्या दरम्यान उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करणारे, व्यत्यय आणणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. परीक्षा चालू असतांना त्याठिकाणी अधिकृतपणे नेमलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रांवरील अधिकृत अधिकारी, कर्मचारी, परीक्षाथीर् यांच्या खेरीज अन्य कोणालाही केंद्रावर प्रवेशास मनाई राहणार आहे.
त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमण्यासही प्रतिबंध केला आहे. या परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ अशी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोबाईल फोनसह तत्सम इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांचा वापर करण्यासही मनाई राहणार आहे. हा आदेश ७ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रासाठी लागू राहणार आहे. या परिसरात मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचेही गोरे यांनी म्हटले आहे.