महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रावर नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:43+5:302021-04-09T04:41:43+5:30
ठाणे : विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना काेराेना टेस्ट (आरटीपीसीआर) बंधनकारक केल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून ...
ठाणे : विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना काेराेना टेस्ट (आरटीपीसीआर) बंधनकारक केल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून आले. सकाळपासूनच पालिकेच्या विविध केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनी कोरोना टेस्ट सक्तीची केली आहे. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली तरच त्यांना काम करायला दिले जाईल, असे आदेश आहेत. त्यामुळेच ही गर्दी वाढल्याचे दिसत होते. महापालिकेची काही केंद्र सकाळी ११ वाजेनंतर सुरू झाल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
राज्य सरकारतर्फे मिनी लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवेत काम करणारे, दुकानात काम करणारे, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे, रिपेअरिंगचे काम करणारे आदींसह विविध आस्थापनांत काम करणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. येत्या १० एप्रिलच्या आत ही चाचणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच गुरुवारी सकाळपासून शहरातील अनेक केंद्रांवर चाचणी करून घेण्यासाठी गर्दी उसळल्याचे दिसत हाेते. त्यातही रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांनाही १० एप्रिलपर्यंत चाचणी बंधनकारक केल्याने त्यांनीही चाचणी करून घेण्यासाठी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसत होते.
ठाणे महापालिका हद्दीत काेराेना चाचणीची १२ केंद्रे विविध भागांत सुरू आहेत. त्यानुसार मानपाडा, टेंभीनाका, कळवा, वागळे, सावरकरनगर, लोकमान्यनगर आदींसह इतर केंद्रांच्या बाहेरही सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक केंद्र ११ वाजेनंतर सुरू हाेत असल्याने रांगेत उभे असलेल्या नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. त्यातही अतिशय धिम्या गतीने अनेक केंद्रावर कामे सुरू असल्याचे चित्र दिसत होते. तर, अनेक केंद्रांवर मनुष्यबळाचा अभावही जाणवत होता. त्यातही उशिराने केंद्र सुरू झाल्याने अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. दुकाने सुरू होणार अशी आशा असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी चाचणी करून घेण्यासाठी रांग लावली होती.
काेट
ठाणे महापालिका हद्दीत १२ केंद्रांवर काेराेना चाचणी केली जात आहे. विविध आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने केंद्रावर गर्दी झाली होती.
- डॉ. राजू मुरूडकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा