कल्याणमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:31+5:302021-07-07T04:50:31+5:30
कल्याण : राज्य सरकारकडून केडीएमसीला कोरोना प्रतिबंधक लसीचे अपुरे डोस मिळत असल्याने, मागील पाच दिवसांपासून शहरातील लसीकरण बंद होते. ...
कल्याण : राज्य सरकारकडून केडीएमसीला कोरोना प्रतिबंधक लसीचे अपुरे डोस मिळत असल्याने, मागील पाच दिवसांपासून शहरातील लसीकरण बंद होते. लसीकरण मंगळवारी सुरू झाल्याने विविध केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली. दरम्यान, लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने, बुधवारी सर्व केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार असल्याचे मनपाने कळविले आहे.
कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातील केंद्रावर मंगळवारी सकाळी लसीकरणासाठी नागरिकांनी भली मोठी रांग लावली होती. ही रांग शिवाजी चौकापर्यंत पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचबरोबर, सुभाष चौकातील रेल्वेच्या सेंट्रल स्कूलमधील लसीकरण केंद्रावरही नागरिकांची गर्दी झाली होती. पावसाने दडी मारल्याने वातावरणात उष्णता आहे. नागरिक घामाघूम होऊन लसीसाठी रांगेत उभे होते.
मनपा हद्दीतील लसीकरण पाच दिवस बंद असल्याने, एकदमच मंगळवारी लसीकरणाच्या प्रक्रियेवर ताण आला आहे. लसीचे डोस अपुरे असल्याने अनेकांना रांग लावूनही डोस मिळणार की नाही, अशी चिंता सतावत होती. मोहने येथील शांताराम पाटील मराठी शाळेतील केंद्रावर शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर यांनी चांगली व्यवस्था केल्याची प्रतिक्रिया लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनी दिली.
६३ हजार नागरिकांना दिले दोन्ही डोस
केडीएमसी हद्दीतील ६३ हजार नागरिकांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस दिल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचबरोबर, मनपाने मोबाइल लसीकरण सुरू करण्याची सुतोवाच केले आहेत. त्यासाठी १० लाख डोसची आवश्यकता आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचेही नियोजन मनपा करीत आहे. मात्र, नियमित लसीकरणासाठीच पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने, मोबाइल आणि घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे काम नेमके कधी सुरू होणार, याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
------------------