नोकरदारांची गर्दी पूर्णत: ओसरली इंदिरा गांधी चौकात शुकशुकाट, एसटी बस रिकाम्याच धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:01 AM2020-07-03T03:01:18+5:302020-07-03T03:01:35+5:30

दुसरीकडे बुधवारी अनेकांनी भाजी, किराणा व अन्य वस्तू खरेदी केल्याने कोणीही गुरुवारी बाजारात फिरकले नाही.

Crowd of employees completely receded at Indira Gandhi Chowk: ST buses run empty | नोकरदारांची गर्दी पूर्णत: ओसरली इंदिरा गांधी चौकात शुकशुकाट, एसटी बस रिकाम्याच धावल्या

नोकरदारांची गर्दी पूर्णत: ओसरली इंदिरा गांधी चौकात शुकशुकाट, एसटी बस रिकाम्याच धावल्या

googlenewsNext

अनिकेत घमंडी

डोंबिवली : केडीएमसी प्रशासनाने गुरुवारपासून केलेल्या लॉकडाऊनला डोंबिवलीत चांगला प्रतिसाद मिळाला. बजारपेठांमधील दुकाने बंद होती. नागरिकांनी घरी राहणेच पसंत केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. सकाळी कामावर जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकात नोकरदारांच्या रांगाही लागल्या नाहीत. त्यामुळे एसटी बस रिकाम्याच धावल्या.

कोरोना रोखण्यासाठी सरकारने मार्चअखेरीस लॉकडाऊन जाहीर केले होते. सुरुवातीला नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले. त्यावेळी ई-पास व त्यासंबंधित प्रक्रियेसाठी मजुरांची महापालिका व पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी दिसू लागली. पुढे अनलॉक झाल्यानंतर अनेक व्यवहार सुरू झाले. नोकरदारही कामावर जाण्यासाठी एसटी बससाठी गर्दी करू लागले. नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर वावरत होते. मात्र, वाढत्या रुग्णांमुळे गुरुवारपासून केलेल्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.

केंद्र, राज्य सरकारच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर पोर्ट ट्रस्ट, टपाल, राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील या भीतीने अनेक नोकरदार कामावर जाण्यासाठी निघाले नाहीत. त्यामुळे इंदिरा गांधी चौकात त्यांच्या रांगा लागल्या नाहीत. सकाळच्या सत्रातील अल्प प्रतिसाद पाहून एसटी नियंत्रकांनी डोंबिवलीत जादा बस न पाठवण्याची विनंती नियंत्रण कक्षाला केली. ३० जूनपर्यंत सकाळी डोंबिवलीतून ९० ते १०० बस सुटत होत्या. परंतु, गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मंत्रालय, ठाणे, कल्याण मार्गांवर ५० बस सुटल्या. त्याही प्रवाशांअभावी रिकाम्या धावल्या.

दुसरीकडे बुधवारी अनेकांनी भाजी, किराणा व अन्य वस्तू खरेदी केल्याने कोणीही गुरुवारी बाजारात फिरकले नाही. सकाळच्या वेळेत तुकारामनगर, शेलार नाका, फडके पथ, या भागात काही भाजी, फळविक्रेते बसले होते. महापालिकेने त्यांना समज देऊन पथारी उचलण्यास सांगितले. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही अर्धे शटर उडघण्यात आली होती. किराणा माल दुकानदारांनी सामानाची होम डिलिव्हरी दिली. मात्र, लॉकडाऊनचा फटका बसल्याने किराणा दुकानदार, औषध आणि भाजी विक्रेते आदींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अत्यावश्यक सेवेसाठीच्या आॅनकॉल सेवेतील रिक्षा रस्त्यावर दिसून आल्या. सकाळी ९ नंतर रामनगर, विष्णूनगर भागात पोलिसांनी रिक्षा फिरवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.

ठाकुर्ली पुलानजीक वाहनतपासणी
पोलिसांनी शेलारनाका, ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात नाकाबंदी केली होती. विनाकारण घराबाहेर पडणाºयांना पोलीस परतवून लावत होते. केवळ वैद्यकीय व सरकारी असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांनाच पोलीस सोडत होते. नाकाबंदीमुळे पुलाच्या परिसरात पूर्व-पश्चिमेस दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून तुरळक सुरू असलेली वर्दळही सकाळी ११ नंतर कमी झाली.

Web Title: Crowd of employees completely receded at Indira Gandhi Chowk: ST buses run empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.