ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:53 AM2021-02-20T05:53:15+5:302021-02-20T05:53:15+5:30
उल्हासनगर : माजी आमदार ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त कलानी समर्थकांनी बुधवारी भाटिया चौकात शक्तिप्रदर्शन केले. कलानी कुटुंबाकडून २०२२ मधील ...
उल्हासनगर : माजी आमदार ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त कलानी समर्थकांनी बुधवारी भाटिया चौकात शक्तिप्रदर्शन केले. कलानी कुटुंबाकडून २०२२ मधील महापालिका निवडणुकीचे एकप्रकारे बिगूलच वाजविले गेले. यावेळी झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. दरम्यान, कलानी कुटुंब व समर्थकांनी ऐन कोरोना काळात गर्दी केल्याने टीकेची झोड उठत आहे.
उल्हासनगरातील राजकारण गेल्या तीन दशकांपासून कलानी कुटुंबाभोवती फिरत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे औचित्य साधून कलानी कुटुंबाने व समर्थकांनी कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त भाटिया चौकात शक्तिप्रदर्शन केले. यावेळी ज्योती कलानी, ओमी कलानी व पंचम कलानी यांच्या हस्ते २०२२च्या निवडणुकीचे बिगुल वाजविले. स्वामी शांती प्रकाश पुतळा परिसरात जमलेल्या कलानी कुटुंबासह हजारो समर्थकांनी बुधवारी रात्री एकच जल्लोष केला.
महापालिकेत कलानी सत्ता अबाधित राहण्यासाठी कलानी कुटुंब सक्रिय झाले असून, गेल्या महापालिका निवडणुकीत ओमी कलानी टीमने भाजपसोबत आघाडी करून समर्थकांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविले होते. ओमी टीममुळे भाजप कधी नव्हे ते सत्तेत येऊन पक्षाला महापौर पद मिळाले. विधानसभेची उमेदवारी कलानी कुटुंबाला दिली नसल्याच्या निषेधार्थ भाजपमधील ओमी टीम नगरसेवकांनी बंडखोरी करून महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करण्याऐवजी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले.
चौकट
गंगोत्री-कलानी आमनेसामने
महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक व पदाधिकारी ओमी कलानी टीममध्ये गेले. ज्योती कलानी नावाला राष्ट्रवादी पक्षात राहिल्या. अशावेळी भरत गंगोत्री यांनी राष्ट्रवादीचा प्रचार करून प्रभाग क्र. १७ मधून स्वतःसह चार नगरसेवक निवडून आणून पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले. यातूनच कलानी विरूद्ध गंगोत्री आमनेसामने उभे ठाकले आहेत.
--------------------------
फोटो आहे