मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जनसागर; देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 06:54 AM2023-02-10T06:54:53+5:302023-02-10T06:55:54+5:30
नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार आणला. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून २१ किलो वजनाचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली.
ठाणे : बुधवारी रात्री बारा वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘शुभदीप’ या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने शुभेच्छा देण्यासाठी तुफान गर्दी पाहण्यास मिळाली. शिंदे यांनी आपल्या किसननगर येथील जुन्या घराला भेट दिली आणि तेथे ते आपल्या जुन्या आठवणींमध्ये रममाण झाले. त्यांनी तेथील शाखेलाही भेट दिली.
शिंदे यांनी आनंद आश्रमात येण्यापूर्वी दिवंगत आनंद दिघे यांना शक्तिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर ते आनंद आश्रमाकडे रवाना झाले. या ठिकाणी त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथील लहान मुलांसह केक कापून वाढदिवस साजरा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळीच अभीष्टचिंतन केले. भाजप आमदार निरंजन डावखरे यावेळी हजर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दूरध्वनी करून शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
कोणी धान्य, कोणी क्रिकेटचे साहित्य, कोणी खाद्यपदार्थ वाटप केले. नऊ रुपयांमध्ये नऊ खाद्यपदार्थांची मेजवानी आणि मोफत पाणीपुरी वाटप अशा उपक्रमांनी लक्ष वेधून घेतले होते. शिवाजी महाराज मैदानात कबड्डी सामन्यांचे आयोजन केले होते.
सव्वा किलोचा कंदी पेढ्यांचा हार
शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कंदी पेढ्यांचा हार घेऊन सातारकर आले होते. सव्वा किलो कंदी पेढ्यांच्या या हारामध्ये ७५ पेढ्यांचा समावेश होता.
खारीक खोबऱ्याचा हार भेट
नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार आणला. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून २१ किलो वजनाचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली.