क्यूआर कोडसाठी प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:45 AM2021-08-17T04:45:20+5:302021-08-17T04:45:20+5:30
११ ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल पास देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्याच दिवशी महापालिकेचा मदत ...
११ ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल पास देण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पहिल्याच दिवशी महापालिकेचा मदत कक्ष सकाळी ७ ऐवजी तब्बल दीड तास उशिरा सुरू झाल्याने भाईंदर पूर्वेला प्रवाशांना रांगेत रखडावे लागले. त्यामुळे लोकांनी पालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
क्युआर कोडसाठी सुरुवातीला जशी गर्दी उसळली, तशी ती आता काहीशी कमी झाली आहे. त्यातच बहुसंख्य नागरिकांना अजून पहिला डोसच मिळालेला नाही. अनेकांनी पहिला डोस घेतला, परंतु दुसरा डोस मिळाला नसल्याने तूर्तास पाससाठी गर्दी कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाईंदर पूर्व व पश्चिम तसेच मीरा रोड या दोन रेल्वेस्थानकांमध्ये महानगरपालिकेचे प्रत्येकी २ मदत कक्ष सकाळी ०७.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू करण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला असल्याच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत तसेच फोटो असलेले मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत तपासणी केल्यानंतर कागदपत्रांवर विशेष शिक्का मारून दिला जात आहे. सदर कागदपत्रे तिकीट खिडकीवर दाखवल्यानंतर पास दिला जात आहे.
एखाद्या व्यक्तीने जर बनावट कोविड लसीकरण प्रमाणपत्र आणण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तीविरोधात भारतीय दंडविधान संहितेसह साथरोग नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
या सुविधेचा लाभ घेतेवेळी मदत कक्ष, रेल्वे तिकीट खिडकीवर तसेच प्रत्यक्ष प्रवास करतेवेळी नागरिकांनी गर्दी न करता एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क परिधान करणे तसेच शासनाने कोरोनासंबंधी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले असले तरी प्रत्यक्षात मात्र नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
रेल्वेची हद्द असल्याने रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस बंदोबस्तासाठी असायला हवे असताना स्थानिक पोलिसांनाच रेल्वे हद्दीत तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनासुद्धा अजाणतेपणा व पालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून डोकेदुखी सहन करावी लागत आहे.