उल्हासनगर बाजारपेठेत गर्दीचा उच्चांक, नागरिकांत उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:48+5:302021-09-06T04:44:48+5:30
उल्हासनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेहरू चौक येथील बाजारपेठेत शनिवारी व रविवारी बाप्पाच्या आरास साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी ...
उल्हासनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेहरू चौक येथील बाजारपेठेत शनिवारी व रविवारी बाप्पाच्या आरास साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. स्वस्त व विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत विक्रीला आले असून, कोरोना नियमांचे दुकानदार व नागरिकांकडून सर्रासपणे उल्लंघन होत आहे.
बाप्पाच्या आरासासाठी रंगबिरंगी लायटिंग, विविध आकाराचे मकर, विविध फुलांचे हार, प्लास्टिक पाने, माळा, रंगीबिरंगी कपडे आदी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले. खरेदीसाठी ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कर्जत, कसारा व ग्रामीण परिसरातून शेकडो नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याने, गर्दीचा उच्चांक निर्माण झाला. या गर्दीत कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, नागरिकांनी सण साजरे करावे, मात्र कोरोना संसर्गापासून स्वत:सह कुटुंब व नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्याकडून होत आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी केले.
शहरातील नेहरू चौक, कॅम्प नं-४ चे मुख्य मार्केट, शिरू चौक आदी परिसरात नागरिकांनी शनिवारपासून खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत महिलांचे प्रमाण मोठे तर वृद्ध व मुलांचेही प्रमाण लक्षणीय आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने या गर्दीकडे दुर्लक्ष केले असून दुकानदारांनी कोरोना नियमांना केव्हाच केराची टोपली दाखविली. याच परिसरात फटाक्यांचीही दुकाने आहेत. गणेशोत्सवानिमित्त नागरिक इतर साहित्याबरोबर फटाक्यांची खरेदी करीत असल्याची माहिती फटाके विक्रेत्यांनी दिली. बाप्पाच्या आरासाचे साहित्य खरेदी करणाऱ्या एका भक्ताने तर किती दिवस घरात मरणाच्या भीतीने घालवायचे, असा उलटप्रश्न करून बापाच्या आगमनाची चाहूल लागल्याचे सांगितले. एकंदरीत बापाच्या आगमनाने कोरोनाची भीती लोकांच्या मनातून पळाल्याचे चित्र आहे.