अंबरनाथ, बदलापूर रेल्वेस्थानकात नेहमीप्रमाणे गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:41 AM2021-04-16T04:41:05+5:302021-04-16T04:41:05+5:30
अंबरनाथ, बदलापूर : संचारबंदी लागू असतानाही रेल्वे प्रशासनाला कोणतेही आदेश न आल्याने कोणताही कर्मचारी थेट रेल्वे प्रवास करीत ...
अंबरनाथ, बदलापूर : संचारबंदी लागू असतानाही रेल्वे प्रशासनाला कोणतेही आदेश न आल्याने कोणताही कर्मचारी थेट रेल्वे प्रवास करीत होता. अशा परिस्थितीत अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेस्थानकात नेहमीप्रमाणेच गर्दी दिसत होती. संचारबंदीचा कोणताही परिणाम रेल्वेसेवेवर झाला नाही.
राज्य सरकारचे आदेश रेल्वे प्रशासनाला न आल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू केले नव्हते. सकाळी सहापासून नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ रेल्वेस्थानक परिसरात होती. हीच परिस्थिती बदलापूर रेल्वेस्थानकातही निर्माण झाली होती. एकही पोलीस कर्मचारी रेल्वेने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र तपासत नव्हता. प्रत्येकासाठी रेल्वेस्थानकाचे मार्ग खुले होते. त्यामुळे रेल्वेस्थानक आणि लोकलमधील गर्दीवर संचारबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही.
दुसरीकडे, रस्त्यावरील वाहतुकीवरही कोणताही परिणाम संचारबंदीचा झालेला दिसला नाही. बेशिस्तपणे नागरिक कसलीही पर्वा न करता आपली खासगी वाहने घेऊन घराबाहेर पडली होती. वाहनचालकांवर शिस्तीचा कोणताही परिणाम होत नसल्याने अखेर सकाळी १० वाजता अंबरनाथमधील सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि पूर्व भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे हे नाकाबंदीचे नियंत्रण करीत होते. प्रत्येक वाहनचालकांची विचारपूस करूनच त्यांना पुढे सोडले जात असल्याने काहीकाळ अंबरनाथ पश्चिम भागात वाहतूककोंडी झाली होती. मात्र, नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्याची बाब समोर आली. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात भाजी मंडईमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ दिसत होती. त्या ठिकाणी कोणतेही नियम न पाळता भाजीविक्रेते व्यवसाय करीत होते.