महिलांच्या आनंदावर विरजण, रेल्वे प्रवासाची मुभा नाहीच; विरार स्थानकात महिलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:53 PM2020-10-18T12:53:38+5:302020-10-18T12:53:44+5:30
लोकल सेवा सुरू होणार असल्याचे कळताच शनिवारी सकाळपासून महिलांनी रेल्वे प्रवासासाठी स्थानक गाठले, मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक केल्याने महिलांच्या सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नालासोपारा : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महिलांसाठी मुंबई लोकल सेवा सुरू करण्याची भूमिका घेतल्याने महिलांना दिलासा मिळाला होता. मात्र, राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात रेल्वे बोर्डाने पश्चिम व मध्य रेल्वेने लोकल सेवा महिलांसाठी सुरू होणार नाही, असा निर्णय घेतला. एका दिवशी लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही, असे रेल्वेने सांगितल्याने महिला प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
लोकल सेवा सुरू होणार असल्याचे कळताच शनिवारी सकाळपासून महिलांनी रेल्वे प्रवासासाठी स्थानक गाठले, मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक केल्याने महिलांच्या सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रेल्वे प्रवासासाठी विरार रेल्वे स्थानकात महिलांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेसेवेसाठी अनेक महिला ताटकळत उभ्या होत्या. दोघांच्या भांडणात महिलांची काय चूक, अशी संतप्त प्रतिक्रिया मनीषा वाडकर यांनी लोकमतला दिली, तर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महिलांना राज्य सरकारने ट्रेनचा प्रवास करण्याची मुभा देऊन एक प्रकारे गिफ्ट दिले होते, पण रेल्वे प्रशासनाने महिलांना प्रवास नाकारत राजकारण केल्याचा आरोप प्रवासी नीता पंदिरकर यांनी केला आहे.