बघ्यांची गर्दी अन् विदेशी पाहुण्यांकडून बिबट्याचीच चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 03:37 AM2019-02-21T03:37:04+5:302019-02-21T03:37:50+5:30
जितेंद्र कालेकर ठाणे : ठिकाण कोरम मॉल... वेळ पहाटे ५.४० ची... मॉलच्या वाहनतळात बिबट्या शिरल्याचे सुरक्षारक्षकाने पाहिले. याबाबत माहिती ...
जितेंद्र कालेकर
ठाणे : ठिकाण कोरम मॉल... वेळ पहाटे ५.४० ची... मॉलच्या वाहनतळात बिबट्या शिरल्याचे सुरक्षारक्षकाने पाहिले. याबाबत माहिती मिळताच वनविभागासह सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर, बिबट्या आणि शोध पथकामध्ये सुरू झालेला पाठशिवणीचा खेळ साडेसहा तास सुरू होता.
दुर्घटना घडल्यास मदतीसाठी ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दल यांची पथकेही सज्ज होती. बिबट्या सत्कार रेसिडेन्सीमध्ये पोहोचल्याचे समजताच सर्व पथकांनी तिकडे धाव घेतली. अखेर, साडेसहा तासांच्या थरारानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. तोपर्यंत बिबट्या शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी झाली. त्यामुळे बचावकार्यात अडथळे आले. दरम्यान, हॉटेलमधील विदेशी पाहुणेही बिबट्याची उत्सुकतेने विचारपूस करत होते.
बिबट्याला पकडण्यासाठी ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या वेगवेगळ्या पथकांनी ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई, ठाण्याचे परिक्षेत्र वनअधिकारी दिलीप देशमुख आणि बोरिवली उद्यानाचे संजय वाघमोडे आदींच्या मार्गदर्शनाखाली पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पेठे, वनपाल रवींद्र तवर, मनोज परदेशी, वनरक्षक सचिन सुर्वे, अमिष रसाळ आणि वनमजूर संतोष भांगने आदी ७० ते ८० जणांच्या बचाव पथकाने बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सकाळी ६.३५ पासून व्यूहरचना केली. सकाळी ७ वाजता तो सत्कार रेसिडेन्सीमध्ये शिरल्याची माहिती वनविभागाला मिळाली. ही बातमी बाहेर पसरताच बघ्यांची गर्दी तसेच बिबट्याला कॅमेºयात कैद करण्यासाठी हॉटेलची संरक्षक भिंत तसेच मिळेल ती जागा पकडल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. बिबट्या लपून बसल्याने सकाळी ७ ते ११ हे चार तास त्याची काहीच हालचाल नव्हती. अखेर, दोन कोंबड्या त्याच्या दिशेने सोडल्या. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल प्रशासनाकडे आवारात फटाके वाजवण्याची संमती मागितली. तोपर्यंत ज्या खोलीत तो शिरला होता, तिथे छोटे बीळ केले. फटाक्यांच्या आवाजाने तो बिळाच्या समोर येताच डॉ. शैलेश पेठे यांनी भिंतीच्या आडून २० फुटांच्या अंतरावरून रायफलीच्या साहाय्याने ट्रॅन्क्विलायझेशन हे इंजेक्शन ११.३० वाजता मारले. तो बेशुद्ध पडल्याची खात्री होताच ११.४० ते ११.५० या १० मिनिटांच्या काळात वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याला पकडून लोखंडी पिंजºयात ठेवले.
‘त्या’ कर्मचाºयाचा होणार सत्कार
हॉटेलमध्ये शिरलेला बिबट्या सांडपाण्याची टाकी असलेल्या खोलीत गेल्याचे समीर शेख या देखभाल दुरुस्ती विभागाच्या कर्मचाºयाने पाहिले. त्याने प्रसंगावधान राखून त्या खोलीच्या दरवाजाची कडी बाहेरून बंद केली. त्यानंतरही अन्य एका दरवाजावाटे तसेच लोखंडी दरवाजाच्या वरील बाजूने बिबट्याला बाहेर पडणे शक्य होते. पण, आत गेल्यानंतर तो शांत राहिला. समीरच्या धाडसाचे कौतुक होत असून त्याचा लवकरच सत्कार करणार असल्याचे हॉटेलचे महाव्यवस्थापक प्रणबेश बॅनर्जी यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
वर्दळीच्या ठिकाणच्या सिंघानिया शाळेसमोरील हॉटेल सत्कार रेसिडेन्सीमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची पोलीस, वनकर्मचाºयांशी बाचाबाची
बिबट्याची छबी टिपण्यासाठी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी हॉटेलच्या आवारामध्ये गर्दी केली होती. बिबट्याला नेण्यासाठी आणलेला पिंजरा हॉटेलच्या मागील प्रवेशद्वारावर होता. त्यानंतर तो पिंजरा आत नेला. तेव्हा छायाचित्रकारांना आत येण्यास बंदी केल्याने पोलीस, वनविभाग कर्मचारी यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. पिंजºयातून बिबट्याला वनविभागाच्या वाहनापर्यंत नेईपर्यंत छायाचित्रणासाठी झुंबड उडाली. यावेळी झालेल्या रेटारेटीमुळे काहींच्या कॅमेºयांचे नुकसानही झाले, तसेच धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर, आमदार प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी करत हा
वाद मिटवला.
सकाळी
८ वाजता सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये बिबट्या दिसला. त्यानंतर, नियोजन करून तीन तासांमध्ये विविध पथकांच्या मदतीने त्याला भूल देऊन पकडले.
- जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे