कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:46+5:302021-09-06T04:44:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बाजारपेठांत माेठी गर्दी हाेत आहे. खरेदी-विक्रीसाठी दुकाने सुरू ठेवताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बाजारपेठांत माेठी गर्दी हाेत आहे. खरेदी-विक्रीसाठी दुकाने सुरू ठेवताना कोरोना नियमांचे पालन करावे, असे महापालिकेचे आदेश असताना या नियमांचे कुठेही पालन होताना दिसून येत नाही. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे तिसरी लाट कशी काय रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दीड वर्षापासून कोरोनाचा सामना केला जात आहे. पहिली आणि दुसरी लाट ओसल्यावर कोरोनाचे काही निर्बंध शिथिल करण्यात आले. मागच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यावर बरेच निर्बंध होते. यंदा हे निर्बंध खूपच साैम्य करण्यात आले आहेत. गणेशाेत्सव हा माेठा सण असल्याने सर्वप्रकारच्या दुकानांनी बाजारपेठ फुलून गेली आहे. घरगुती गणपतींचे प्रमाण खूप असल्याने बाजारात गणेशाची आरास, कपडे, पूजेचे साहित्य, गोडधोड, मोदक खरेदी करण्यासाठी एकच गर्दी बाजारात दिसून येत आहे. दुकानदारांना ग्राहकांसाठी सॅनिटायझर देणे बंधनकारक आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंग काटेकाेर पाळणे ही जबाबदारी दुकानदारांची असणार आहे. मात्र, अनेक दुकानांमध्ये साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.
ठाण्यात फेरीवाल्यांनी महिला सहायक उपायुक्तांवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर केडीएमसीच्या महापालिका अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्याच दिवशी फेरीवाल्यांच्या विरोधात स्टेशन परिसरात पालिकेचे पथक कारवाईसाठी गेले हाेते. मात्र, त्यापूर्वीच फेरीवाले पसार झाले हाेते. त्यानंतर काहीच हालचाल न झाल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा रस्त्यांचे पदपथ व्यापले आहेत. त्यांच्याकडे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी माेठी गर्दीही दिसून येत आहे. त्यांच्याकडून नियमांचे पालन हाेत नाही. तसेच, डी मार्टमध्येही ग्राहकांची गर्दी आहे. महापालिकेने यापूर्वी डी मार्टच्या विरोधात दोन वेळा कारवाई केली आहे. तरीही गर्दीला आवार घातलेला नाही. शहरातील मेगा मार्ट दुकानांतही गर्दी दिसत आहे. पालिकेने कारवाई पथके नेमली असली तरी कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात त्यांनी काेणतीच कारवाई केलेली नाही. मास्क न घालणाऱ्यांविराेधातही कारवाई केली जात होती. महापालिका हद्दीत शनिवारी ११२ कोरोना रुग्ण आढळले हाेते. याआधी ही आकडेवारी १०० च्या आत होती. ही धोक्याची घंटा आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. निर्बंध शिथिल झाले म्हणून नागरिकांनी नियमांबाबत बेफिकिरी दाखवल्यास ते घातक आणि जीवघेणे ठरू शकते.
गणेशाेत्सवानंतर रुग्णसंख्या वाढण्याची भीती
गतवर्षी गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. कल्याण स्टेशन परिसरातील जोशी बागेतील एका कुटुंबातील ३५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा झाला होता. यंदाही अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडून व्यक्त केली जात आहे. परदेशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे आपल्याकडे सण-उत्सवानंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.
फोटो-कल्याण-गर्दी
---------------------------------------------