नियोजनाअभावी लसीकरण केंद्रांवर गर्दी-गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:24+5:302021-03-04T05:15:24+5:30

ठाणे : सोमवारी पहिल्या दिवशी लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी ठाण्यात महापालिकेने सुरू केलेल्या ...

Crowds at vaccination centers due to lack of planning | नियोजनाअभावी लसीकरण केंद्रांवर गर्दी-गोंधळ

नियोजनाअभावी लसीकरण केंद्रांवर गर्दी-गोंधळ

Next

ठाणे : सोमवारी पहिल्या दिवशी लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मंगळवारी दुसऱ्या दिवशी ठाण्यात महापालिकेने सुरू केलेल्या अनेक केंद्रावर गोंधळ, गर्दी आणि नियोजनाचा अभाव दिसला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक चांगलेच संतापले होते. एकीकडे उन्हाच्या झळा त्यात बसण्यासाठी खुर्च्यांचा अभाव, पिण्यास पाणी नाही. त्यात सकाळी १० वाजल्यापासून बसूनही लसीकरणासाठी तीन तास ताटळकत थांबावे लागल्याचे चित्र होते. कोपरी येथील लसीकरण केंद्रावर हा गोंधळ अधिक होता. त्याठिकाणी पाहणीस गेलेल्या महापौर नरेश म्हस्के यांना चक्क ज्येष्ठ नागरिकांनी घेराव घातला. यामुळे महापौरांवर त्यांची माफी मागण्याची वेळ आली.

ठाणे महापालिका हद्दीत खाजगी रुग्णालयांच्या ठिकाणी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या १५ केंद्रावर ती सुरू झाली आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून यातील बहुसंख्य केंद्रावर ज्येष्ठांच्या रांगा होत्या. महापालिकेने १२ ते ५ ही वेळ निश्चित केली असली तरी आपला क्रमांक पहिला लागावा यासाठी ज्येष्ठ नागरिक प्रत्येक केंद्रावर वेळेत हजर असल्याचे दिसले. परंतु, पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका त्यांना बसला.

ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन

नोंदणी करण्याचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याचे चित्र सलग दुसऱ्या दिवशीही दिसले. त्यामुळे नोंदणी करण्यासही उशीर लागत होता. त्यामुळे देखील अनेक ठिकाणी रांगा लागल्या.

कोपरीच्या केंद्रावर उडाला गोंधळ

कोपरी येथे आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून ज्येष्ठांनी रांगा लावल्या होत्या. परंतु लसीकरणाला दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. विशेष म्हणजे आधी लखीचंद फतीचंद येथे हे लसीकरण करण्यात येत होते. परंतु, मंगळवारी अचानक ठिकाण बदलल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय महापौर येणार म्हणून ते आल्यानंतर लसीकरण सुरू केले. त्यामुळे ज्येष्ठांनी याचा राग थेट त्यांच्यावरच काढला. सकाळपासून रांगेत उभे असताना साधे पिण्यास पाणी कोणी दिलेले नाही, बसण्यासाठी खुर्च्या नाहीत, उन्हातान्हात बाहेरच रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यानंतर मात्र महापौरांना त्यांची माफी मागावी लागली. ॲप सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बसण्यासाठी अधिकाऱ्यांना सांगून खुर्च्या आणि पाणी उपलब्ध करून दिले.

- दुसरा डोस घेणाऱ्यांमुळेही गर्दीत पडली भर

ज्येष्ठांबरोबर अनेक केंद्रावर दुसरा डोस घेण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्सने देखील गर्दी केल्याने आधी येऊनही ज्येष्ठांना या वर्कर्सनंतर लसीकरण केले जात होते. त्यामुळे याचीही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे देखील अनेक केंद्रावर गर्दी झाली हाेती.

आधी लखीचंद फतीचंद केंद्रावर लसीकरण सुरू होते. मात्र, एका दिवसात केंद्र का बदलले. सकाळपासून येथे ज्येष्ठ नागरिक आले असून त्यांच्यासाठी पाण्याची, बसण्यासाठी व्यवस्था केली नाही. महापालिकेने किमान या गोष्टींकडे तरी गांभीर्याने पाहणे गरजेचे होते.

(भरत चव्हाण - स्थानिक नगरसेवक, भाजप)

केंद्रावर गोंधळ झाल्याचे, सुविधा मिळत नसल्याचे मी मान्य करतो, परंतु, ॲपचे सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने अडचण निर्माण झाली. तसेच दुसरा डोस घेण्यासाठी देखील फ्रंटलाईन वर्कर्स आल्याने हा गोंधळ उडाला. परंतु, दोन ते तीन दिवसात यावर तोडगा निघून योग्य पद्धतीने लसीकरण होईल. ज्येष्ठांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो.

(नरेश म्हस्के - महापौर, ठामपा)

Web Title: Crowds at vaccination centers due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.