न्यायाकरिता झगडणाऱ्या पित्यावर निर्घृण हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:59 AM2018-05-04T01:59:35+5:302018-05-04T01:59:35+5:30

पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणा-या मितेश जगतापचा ज्यांनी छळ केला, त्या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी, याकरिता न्यायालयीन लढा लढणारे त्याचे वडील राजेश यांना

The cruel attack on the father of justice | न्यायाकरिता झगडणाऱ्या पित्यावर निर्घृण हल्ला

न्यायाकरिता झगडणाऱ्या पित्यावर निर्घृण हल्ला

Next

सचिन सागरे/उमेश जाधव
कल्याण/टिटवाळा : पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाºया मितेश जगतापचा ज्यांनी छळ केला, त्या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी, याकरिता न्यायालयीन लढा लढणारे त्याचे वडील राजेश यांना हा लढा थांबवण्याकरिता धमकीची तीन पत्रे येऊनही उच्चपदस्थ पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी असताना बुधवारी रात्री त्यांना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर हल्ला केला गेला. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे हे लांच्छनास्पद प्रकरण असून पोलिसांचा भेसूर चेहरा समाजापुढे आला आहे, असे जगताप कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणात संशयाची सुई टिटवाळा पोलिसांकडे दाखवली जात असून वरिष्ठ पोलिसांनी मौन धारण केले आहे.
मितेशच्या आत्महत्येनंतर सातत्याने जगताप कुटुंबीयांना धमक्या येत असल्याने त्यांनी टिटवाळा येथील घर सोडून डोंबिवलीत तात्पुरते स्थलांतर केले. बुधवारी राजेश जगताप हे त्यांच्या टिटवाळा येथील घरी काही कामानिमित्त गेले होते. आपले काम संपल्यानंतर रात्री ९ च्या सुमारास राजेश इमारतीखाली उतरले. त्यावेळी याठिकाणी उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांच्याकडे मितेश प्रकरणाची चौकशी केली. मितेशच्या मृत्यूबाबत सहानुभूती दाखवत राजेश यांना बोलण्यात गुंतवून शीतपेय प्यायला दिले. त्यामुळे राजेश यांना गुंगी आली. अचानक आणखी ३ ते ४ तरुण तेथे आले. त्यांनी राजेश यांना बाजूला असलेल्या झाडीत नेले व त्यांच्या उजव्या दंडावर बीअरच्या बाटलीने हल्ला करून जखमी केले. यांच्या मानेवर वार कर, असे शब्द राजेश यांनी हल्लेखोरांच्या तोंडून ऐकले. राजेश काही काळ बेशुद्धावस्थेत झाडीत पडून होते. शुद्ध आल्यानंतर त्यांनी टिटवाळा पोलीस ठाणे गाठले. जखमी राजेश यांना रात्री टिटवाळ्याजवळील गोवेली रुग्णालयात व त्यानंतर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पार पाडण्यात आली. राजेश यांची पत्नी पुष्पा यांनी सांगितले की, गोवेली व उल्हासनगर येथे योग्य उपचार मिळत नव्हते, तसेच राजेश यांच्या छातीतदेखील दुखत होते. म्हणून आम्ही डिस्चार्ज न घेताच निघून आलो.
टिटवाळा पोलिसांच्या जाचाला कंटाळून मितेश या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येस जबाबदार पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी मितेशच्या आईवडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलीस अधिकारी गणपत सुळे आणि हवालदार अनिल राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला होता.
मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी मितेशचे वडील राजेश आणि आई पुष्पा यांनी आझाद मैदानात तसेच ठाण्यात उपोषण केले होते. त्यानंतर, या दाम्पत्याला धमक्या येऊ लागल्या. त्याला कंटाळून जगताप कुटुंबीयांनी टिटवाळ्यातील घर सोडून ते डोंबिवलीत नातेवाइकांकडे राहण्यास आले. मात्र, डोंबिवलीतील ते राहत असलेल्या घरी धमकीची पत्रे आली. अगोदरची दोन धमकीची पत्रे कोणी पाठवली, याबाबतचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरले. त्यातच धमकीचे तिसरे पत्र मागील गुरुवारी जगताप कुटुंबीयांना त्यांच्या नातेवाइकांच्या घरच्या पत्त्यावर प्राप्त झाले. त्यानंतर, बुधवारी राजेश यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. पोलिसांवरच जगताप यांचा आरोप असताना त्यांचे संरक्षण कसे घेणार, हा त्यांचा सवाल आहे.

जगताप कुटुंब संपवण्याची धमकी
शासनाविरुद्ध तुमचा सुरू असलेला लढा म्हणजे वायफळ प्रयत्न असून त्यातून काहीही होणार नाही. तक्रार मागे घ्या. एका गेलेल्या जीवासाठी तुम्ही जिवंत माणसांचे संसार मोडायला निघालात. दोन वेळा समजावूनही कळत नाही. खूप त्रास दिला. तुम्ही आता सर्व थांबवा. अन्यथा, संपूर्ण कुटुंब नष्ट करू. कोणीही तुम्हाला मदत करणार नाहीत. तुम्ही एक वकील उभा केल्यास आम्ही १० वकील उभे करू, असे या धमकीच्या तिसºया पत्रात नमूद केले होते.

सुनावणीपूर्वी पूर्वनियोजित हल्ला
मितेश आत्महत्येप्रकरणी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र, त्याच्या पूर्वसंध्येलाच राजेश यांच्यावर हल्ला होणे, हे पूर्वनियोजित कृत्य असून हल्लेखोर हे किरकोळ गुंड असले, तरी त्यांना भक्कम पाठिंबा देणारे गॉडफादर वर्दीच्या संरक्षणात फिरत असल्याचे टिटवाळ्यातील नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत.

जखमी
अवस्थेत गेले न्यायालयात
मितेशच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयातील सुनावणीला आम्ही हजर राहू नये, म्हणूनच माझ्यावर हल्ला करण्यात आला. मात्र, हल्ला करण्यास फूस असलेल्यांचे इरादे यशस्वी होऊ नये, याकरिता जखमी अवस्थेत न्यायालयात हजर राहिलो, असे राजेश यांनी सांगितले.

पुढील सुनावणी जूनमध्ये
मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीला राजेश जखमी अवस्थेत हजर राहिल्याने याप्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी होणार असल्याची माहिती मितेशचे मामा नरेश आव्हाड यांनी दिली.

Web Title: The cruel attack on the father of justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.