रेल्वे अधिकाऱ्यांना ठेचून काढा, केडीएमसीच्या महासभेत सदस्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 06:23 AM2019-08-21T06:23:26+5:302019-08-21T06:24:08+5:30

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे व भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी पत्रीपुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल तसेच रेल्वेकडून होणा-या वाहतूक कोंडीबाबत सभा तहकूबीची सूचना मांडली होती.

 Crush to Railway officials, angry at members of KDMC General Assembly | रेल्वे अधिकाऱ्यांना ठेचून काढा, केडीएमसीच्या महासभेत सदस्यांचा संताप

रेल्वे अधिकाऱ्यांना ठेचून काढा, केडीएमसीच्या महासभेत सदस्यांचा संताप

Next

कल्याण : कल्याण डोंबिवलीकरांची रेल्वेकडून चहूबाजूंनी वाहतूककोंडी झाली आहे. यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. त्यातच आता डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाण पूल बंद करण्याचे पत्र रेल्वे प्रशासनाकडून धाडले आहे. डोंबिवलीकरांची रेल्वे कोंडी करीत असेल तर रेल्वेच्या प्रकल्पांना सहकार्य करु नका, रेल्वेचे पाणी तोडा, रेल्वे अधिकाऱ्यांचा माज उतरवा, त्यांना ठेचून काढा, अशी अत्यंत टोकाची भाषा केडीएमसीच्या महासभेत सदस्यांनी मंगळवारी केली.
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे व भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांनी पत्रीपुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल तसेच रेल्वेकडून होणा-या वाहतूक कोंडीबाबत सभा तहकूबीची सूचना मांडली होती. आयुक्त गोविंद बोडके यांनीही रेल्वेकडून अनेक बाबतीत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची कबुली दिली. पत्रीपुलाची कोंडी कायम असतानाच डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाण पूल २८ आॅगस्टपासून बंद करण्याचे पत्र रेल्वेकडून प्राप्त झाले आहे. या कामासाठी निविदा काढली आहे. त्याचा आराखडा तयार आहे का, त्यासाठी किती खर्च येणार, पूल बंद केल्यावर पर्यायी मार्ग कोणता असणार याचा विचार न करता हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यास डोंबिवलीची स्थिती वाईट होईल. ठाकुर्ली येथील रेल्वे उड्डाणपूल अरुंद आहे. त्याचबरोबर या पूलाचा एक मार्ग ठाकूर्लीच्या दिशेने अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कोपर रेल्वे उड्डाणपूल पर्यायी पुलाशिवाय बंद करु नये. बंद करायचा असल्यास जे आधी रेल्वे क्रॉसिंग होते ते पुन्हा सुरु करण्यात यावे अशी सूचना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केली.
भाजप नगरसेवक राहुल दामले म्हणाले की, पत्री पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. नागरीक कोंडीमुळे हैराण झालेले असताना कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल बंद केल्यास तेथेही पत्रीपुलासारखी कोंडी होईल. पत्रीपुलाचे काम झालेले नसताना कोपर पूल बंद करणे योग्य ठरणार नाही. ही समस्या आपण सोडवू शकत नाही हे या शहराचे दुदैव आहे, असे दामले म्हणाले. पुढे सणाचे दिवस आहेत. त्यामुळे कोपर पूल बंद करण्यास मान्यता देऊ नये. तसा ठराव सरकारकडे पाठवावा. या समस्येकडे राज्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आमदारांचे दुर्लक्ष झाल्याने आपण सगळेच कमी पडलो, अशा शब्दांत दामले यांनी नाराजी प्रकट केली.

- या शहरातील नागरीकांचे हाल कुत्रा देखील खात नाही, अशी विदारक स्थिती आहे. जनतेत प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे. आमची गाडी पत्री पुलावरुन जात असताना आमच्या गाडीसमोर असलेली नेम प्लेट आम्हाला झाकून मार्गक्रमण करावे लागते. कारण रस्त्यावरुन जाणारे अन्य प्रवासी व वाहन चालक लोकप्रतिनिधींच्या नावे अक्षरक्ष: शिव्या घालतात, असेही ते म्हणाले. यावेळी सभागृह नेते श्रेयस समेळ, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, नगरसेवक सचिन बारसे, भाजपच्या नगरसेविका खुशबू चौधरी आदींनी रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठवली. यावेळी रेल्वे अधिकाºयांना ठेचण्यापासून रेल्वेचे पाणी तोडण्यापर्यंत विविध मागण्या सदस्यांनी केल्या.

उंच गणेशमूर्तींनाही फटका
हाइट बॅरिअरमुळे कोपर पुलावरून आता यापुढे २.८ मीटरपेक्षा (९ फूट) उंचीची वाहने जाऊ शकणार नाहीत. ऐन गणशोत्सवाच्या पूर्वी हाइट बॅरिअर बसवल्याने उंच गणेशमूर्तींची वाहतूकही पूर्व-पश्चिमेला करता येणार नाही. त्यामुळे आता मंडळांना ठाकुर्ली उड्डाणपुलाचा वळसा पडणार आहे. यासंदर्भात संबंधित मंडळांना दोन दिवसांत माहिती दिली जाईल, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे देण्यात आली.

Web Title:  Crush to Railway officials, angry at members of KDMC General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.