विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आरडाओरड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:16 AM2019-07-25T03:16:06+5:302019-07-25T03:17:03+5:30
युतीबाबत जयंत पाटील यांचा दावा : वंचित आघाडीसोबत पत्रव्यवहार
ठाणे : लोकसभेप्रमाणे विधानसभेतही शिवसेना आणि भाजपमध्ये युती कायमच आहे. परंतु, आता केवळ या दोन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री आमचाच असल्याचा नारा दिला जात असून विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हाी आरडाआरोड सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील बुधवारी यांनी लोकमतशी बोलतांना केला. ज्या पद्धतीने कल्याण आणि मुंबई महापालिका निवडणुकीत ते जो पॅटर्न घेऊन लढले तोच पॅटर्न आताही विधानसभा निवडणुकीत राबवित असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येथील टिप टॉप प्लाझामध्ये जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी त्यांनी खास लोकमतशी बोलतानी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, प्रमोद हिंदूराव, आनंद ठाकूर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना त्यांनी शिवसेनाभाजपाची युती आधीच आम्ही गृहीत धरली आहे. परंतु, आता केवळ आरडाओरड सुरू आहे. विरोधकांच्या बोलण्याकडे जनतेसह माध्यमांचे कसे दुर्लक्ष होईल, त्यांचे मुद्दे कसे हाईलाईट होणार नाहीत, यासाठीच हा सगळा डाव रचला गेल्याचेही त्यांनी सांगितले.
आमची काँग्रेस बरोबर आघाडी आहे, त्यामुळे एकत्रितीच निवडणुका लढविल्या जाणार आहेत. आता लोकसभेची निवडणूक नसून विधानसभेची निवडणूक असल्याने येथे स्थानिक मुद्दे महत्त्वाचे आहेत. राज्यात आज अनेक समस्या आहेत, रोजगार नाही, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत. महागाईने उचांक गाठला आहे, त्यामुळे विधानसभेत परिवर्तन होईल, असा दावाही त्यांनी केला.
मनसेसोबत चर्चा नाही
वंचित बहुजन आघाडीबाबत त्यांना छेडले असता, वंचितला आम्ही एक पत्र पाठविले आहे. त्यानुसार लोकसभेत जे झाले ते झाले आहे, आता मात्र विधानसभेत एकत्र यावे अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्यानुसार त्यांच्याकडूनही आम्हाला पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार पुढील दिशा ठरविली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, वंचितच्या पत्रात काय आहे, याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. मनसे बाबत चर्चा सुरू आहे का? असा सवाल त्यांना केला असता, त्यांच्याशी अद्यापही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. मनसेमध्ये सध्या इव्हीएम मशिनच्या मुद्यावरून चर्चा सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्यासोबत चर्चा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगांच्या जागा बिल्डरांना देण्याचा युतीचा डाव
राज्यात आज अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर येत आहेत. असे असतांना आता एमआयडीसीच्या जागेवर नवनवीन गृहसंकुले उभारणीसाठी परवानगी देऊन त्याठिकाणचे उद्योगधंदे बंद करण्याचे धोरण या युती सरकारने आखले असल्याचा आरोपही त्यांनी केला. एमआयडीसीच्या जागा बिल्डरांना विकून रोजगार बंद करण्याचा घाटही घातला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देणार
आंध्र सरकारने स्थानिकांना नोकरीत प्राधान्य दिले असून, आमचाही पूर्वीपासून तोच अंजेडा असून आजही तो कायम आहे. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर साखर कारखाने, इतर कारखाने, उद्योग, व्यवसाय आदींसह प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, त्याचा टक्का किती असेल, हे सांगण्यास मात्र नकार दिला.
आमच्या मनातील महाराष्ट्र
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक शहरातील काय काय समस्या आहेत, त्या कशा सोडविल्या जाऊ शकतात, युतीच्या काळातील कोणत्या योजना आणि निर्णय सर्वसामान्यांसाठी घातक ठरले आणि भविष्यात महाराष्टÑ कसा असेल या सर्व मुद्यांना उहापोह आमच्या मनातील महाराष्ट्र यातून आम्ही जाहीर करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रत्येक ठिकाणी आठ ते दहा जण इच्छुक
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मुलाखतींचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये प्रत्येक मतदार संघातून ८ ते १० जण इच्छुक असल्याचे दिसून आले. तसेच आता कोणत्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण आमच्यात नसल्याने प्रत्येक जण मेहनत करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे दोन गट आमच्यासोबत
शहरापूरचे राष्ट्रवादीचे आमदार बरोरा यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवधनुष्य हाती घेतले आहे. त्यामुळे या भागात चांगल्याच उलथापालथ सुरू आहे. बरोरा गेल्याने तसा काही फरक पडलेला नाही. परंतु, आता शिवसेनेचे येथील नाराज दोन गट आमच्यासोबत असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. उमेदवारी कोणालाही द्या आम्ही त्यांना मदत करू असेही त्यांनी सांगितले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.