मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ठाणेकरांना घडलं बछड्याचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 11:32 AM2019-12-04T11:32:54+5:302019-12-04T11:35:54+5:30
ठाणेकरांनी काढले बछड्यासोबत फोटो
- विशाल हळदे
ठाणे: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ठाणेकरांना आज बछड्याचं दर्शन घडलं. येऊरमधील मुख्य रस्त्यावर सकाळी अनेकांना बछडा पाहायला मिळाला. यानंतर मॉर्निंग वॉक करत असलेल्या काहींनी वन विभागाशी संपर्क साधला. वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यावर अनेकांनी बछड्यासोबत फोटो काढले. काहींनी तर बछड्यासोबत खेळण्याचादेखील आनंद लुटला.
आज येऊरच्या मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. एअर फोर्स बेसजवळ काहींना बिबट्याच्या डरकाळीसारखा आवाज आला. याची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. तेव्हा दगडाच्या आडोशाला २ दिवसांपूर्वी जन्मलेलं बिबट्याचा बछडा जीवाच्या आकांतानं ओरडताना दिसला.
बछड्याची आई जवळपास असेल म्हणून सुरुवातीला अनेकांनी त्याच्या जवळ जाणं टाळलं. मात्र आजूबाजूला कोणीच नसल्याची खात्री पटल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछड्याला अलगद उचललं. यानंतर बछडा शांतपणे खेळू लागला. यानंतर ठाणेकरदेखील बछड्यासोबत खेळू लागले. बछडा नुकताच जन्माला आल्यानं त्याला स्वत:च्या पायावर उभं राहता येत नव्हतं. त्यामुळे वन विभागानं त्याला बोरिवलीत नॅशनल पार्कमध्ये असलेल्या रुग्णालयात दाखल केलं.