शहापूर तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले काकडीचे उत्पादन; ३०० किलो विक्रीसाठी जाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:12 AM2021-01-29T00:12:54+5:302021-01-29T00:12:54+5:30
बाळू लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे
भातसानगर : शहापूर तालुक्यातील परटोली गावांमध्ये एका शेतकऱ्याने एक एकर जागेमध्ये काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या काकडी उत्पादनातून भरून येईल अशी त्यांना आशा आहे.
परटोली गावातील शेतकरी बाळू वेखंडे व रामचंद्र ढमके यांनी काकडीचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली असून, जवळजवळ दिवसाआड त्यांची ३०० किलो काकडी ही बाजारात विक्रीसाठी जात आहे. मागील महिन्यात शेतकरी हताश झाला होता. उन्हाळ्यामध्ये काकडी, भेंडी यासारखे उत्पादन सध्या तालुक्यामधील शेतकरी घेत आहेत.
बाळू लोखंडे यांनी चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता त्यांचा कल हा पावसाळी शेतीच्या ऐवजी उन्हाळी आणि हिवाळी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घेण्याकडे वळला आहे. आपण अशा प्रकारची शेती करत आहोत याचा तरुणांनी बोध घ्यावा अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला आहे. आज काकडी १६ रुपये किलो जात असून उद्या तिचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या काकडीमधून आपल्याला हजारो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
६०-७० तोड्यातून हजारोंचा नफा होण्याची शक्यता
सध्या काकडीला भाव १६ रुपये किलो इतका असल्याने त्यांनी यासाठी आतापर्यंत २५ हजार इतका खर्च केला असून जवळजवळ ६० ते ७० तोडे या काकडीचे होतील असे या शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे जवळजवळ दररोज पाच हजार रुपयांची काकडी बाजारात जात असून त्यांना यासाठी कमीत कमी ७० ते ८० हजार रुपये नफा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.