सणासुदीतच सांस्कृतिक ठणठणाट! सा-याच नाट्यगृहांची दुरुस्ती, ठाण्याची राज्य नाट्य स्पर्धा पनवेल पळवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:03 AM2017-09-26T04:03:14+5:302017-09-26T04:03:22+5:30
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमधील एक सोडून सारीच नाट्यगृहे दुरुस्तीला काढल्याने जिल्ह्यातील कलाप्रेमींना यंदा सांस्कृतिक ठणठणाटाला सामोरे जावे लागणार आहे.
-महेंद्र सुके/अनिकेत घमंडी ।
ठाणे/डोंबिवली : सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमधील एक सोडून सारीच नाट्यगृहे दुरुस्तीला काढल्याने जिल्ह्यातील कलाप्रेमींना यंदा सांस्कृतिक ठणठणाटाला सामोरे जावे लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका ६ नोव्हेंबरपासून सुरू होणाºया हौशी राज्य नाट्य स्पर्धेला बसणार असून ठाण्यात सादर होणारी नाट्य स्पर्धा पनवेलमध्ये होणार आहे. कल्याणसाठी अद्याप पर्याय सापडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांसाठी येणाºया कलावंतांनी नाट्यगृहांतील गैरसोयींचे फोटो काढून, व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर नाट्यगृह व्यवस्थापनाची झोप उडाली होती. त्यावर, उपाय म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या काळातच दुरुस्तीचा मुहूर्त शोधण्यात आला आहे.
दुरुस्तीला असणाºया नाट्यगृहांमध्ये डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले, कल्याणमधील आचार्य अत्रे आणि ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचा समावेश आहे. ठाण्यातील घाणेकर मुख्य नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम बहुप्रतीक्षेनंतर अलीकडेच पूर्ण झाले आहे; पण त्याच सभागृहाच्या वर असलेल्या मिनी थिएटरच्या दुरुस्तीचा फटका मुख्य थिएटरला बसणार आहे. त्यामुळे ते नाट्यगृह दुरुस्त होऊनही उपक्रमांना देता येणार नसल्याचे कळते. ठाणे जिल्ह्यातील, नवी मुंबईतील वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाची दुरुस्ती प्रस्तावित असल्याचे कळते. मात्र, हा प्रस्ताव महासभेत मंजूर झालेला नाही. साधारण दोनतीन महिन्यांनंतर हे नाट्यगृहही दुरुस्तीसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
ही सारी नाट्यगृहे बंद असल्याने सांस्कृतिक शहरांतील कलारसिकांची भूक भागवण्यासाठी ठाण्यातील गडकरी रंगायतन तेवढे उरले आहे.
अत्रे नाट्यगृह : कल्याणचे अत्रे नाट्यगृह बंद असल्याने रसिक प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. आणखी दोन महिने हे नाट्यगृह बंद राहणार असल्याने कल्याण केंद्रावर होणाºया राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या हौशी नाट्य स्पर्धांसाठी आयोजकांची धावाधाव सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी वाशीचे विष्णुदास भावे नाट्यगृह मिळवण्याची धावाधाव सुरू झाली आहे. याशिवाय, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रसिकांना मुकावे लागणार आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर : ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर मुख्य थिएटरची अलीकडेच दुरुस्ती होऊन सुरू झाले. आता मिनी थिएटर १ आॅक्टोबरपासून बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाºया बालनाट्य स्पर्धा, विविध कार्यक्रम, राज्य नाट्य स्पर्धांच्या फेºयांना फटका बसणार आहे. मिनी थिएटरचे काम सुरू असताना त्याचा त्रास खाली असलेल्या मुख्य नाट्यगृहासही बसणार असल्यानेही तेही जवळपास बंदच राहण्याची शक्यता आहे. नाट्यसंस्था, कलावंत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक आणि कलारसिकांची अशी चौफेर नाकाबंदी करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले नाट्यगृह
डोंबिवलीतील सांस्कृतिक रेलचेल असलेले सावित्रीबाई फुले नाट्यगृह आॅक्टोबरपासून एसीच्या कामासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात केडीएमसी आहे. आॅक्टोबरच्या तारखा संस्थांना न देण्याचा निर्णय नाट्यगृह व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला डोंबिवलीकर सांस्कृतिक मेजवानीला मुकणार आहेत.
दिवाळी पहाट, दिवाळी संध्या यासह वारकरी सप्ताह अशा नानाविध उपक्रमांचे आयोजन डोंबिवलीतील संस्थांनी केले होते. त्यासाठी काहींनी निधी, तिकिटे छापणे यासह सोशल मीडियावर दिवाळीची मेजवानी अशा आशयावर मेसेज टाकले होते. मात्र, नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रेय लधवा यांनी नाट्यगृह बंद राहणार असल्याचे सांगितल्याने आयोजकांची पंचाईत झाली आहे. अचानक घेण्यात आलेल्या निर्णयाने विविध संस्थांच्या नियोजनावर पुरते पाणी फिरले आहे.
एका नाटकाच्या अंकाला ज्येष्ठ दिग्दर्शक भरत जाधव यांना एसीचा त्रास जाणवला होता. त्यांनी महापालिका प्रशासनाला लेखी कळवले होते. त्याची दखल घेत नाट्यगृह व्यवस्थापनाने तातडीने काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही सप्टेंबरपर्यंत ज्यांना तारखा दिल्या आहेत, त्यांना उपक्रम करू द्यावे, नव्याने तारखा देऊ नयेत, असे वरिष्ठांनी आदेश दिले. त्याचे मी पालन करत आहे.
- दत्तात्रेय लधवा, व्यवस्थापक, सावित्रीबाई फुले नाट्यगृह
फुले नाट्यगृह बंद करू नये, असा माझा पूर्ण प्रयत्न आहे. त्यादरम्यान निदान अत्रे नाट्यगृह तरी सुरू करावे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. महापालिका प्रशासनासोबत माझी चर्चा सुरू आहे.
- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली मनपा