सांस्कृतिकदृष्ट्या हे तर महा-राष्ट्र, दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:17 AM2017-12-10T06:17:20+5:302017-12-10T06:17:33+5:30
महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले.
‘आगरी युथ फोरम’च्या वतीने डोंबिवली क्रीडासंकुलात आयोजित पंधराव्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन स्वामी कृष्णानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत व दाक्षिणात्य अभिनेत्री शीला माधवन यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अभिनेता मधू सर यांच्यासह आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
अदूर गोपालकृष्णन म्हणाले की, केरळ आणि महाराष्ट्र यांच्या संस्कृतीचे दर्शन या आगरी महोत्सवातून होत आहे. अशा प्रकारचे उत्सव सातत्याने आयोजित केले जावे. त्यातून मराठी व मल्याळी यांचा स्नेह वाढीस लागेल. आंतरभारतीय संस्कृतीची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे होईल. महाराष्ट्रात केरळी मोठ्या प्रमाणात राहतात. महाराष्ट्र व मुंबईच्या जडणघडणीत त्यांचाही सहभाग आहे, याकडे गोपालकृष्णन यांनी लक्ष वेधले.
अभिनेत्री शीला माधवन म्हणाल्या की, आगरी महोत्सवाने महाराष्ट्रीयन व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा विचार प्रत्यक्षात आणला. महाराष्ट्राचे मन खूप मोठे आहे. त्याचा आम्हाला हेवा वाटतो.
या वेळी आगरी युथ फोरमच्या वतीने वझे यांच्या हस्ते दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन व अभिनेत्री शीला माधवन यांना प्रत्येकी एक लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.
माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी म्हणाले की, आगरी महोत्सवाचा लौकिक सातासमुद्रापार नेण्याचे काम वझे यांनी केले आहे. त्यामागे त्यांची मेहनत आहे. दोन भिन्न संस्कृतींचे दर्शन व एकोपा याचा सात दिवस उत्सव सुरू राहणार आहे. त्याचा आनंद नागरिकांनी घ्यावा.
प्रारंभी फोरमचे अध्यक्ष वझे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, आगरी व केरळी संस्कृतीचे दर्शन घडवण्यावर आमच्या समाजातील काही मंडळीनी टीका केली असली तरी त्याला आम्ही चोख उत्तर दिले आहे. आगरी संस्कृती व अन्य संस्कृती यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नात काही मंडळी बाधा आणत असली, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही हे पाऊल उचलले आहे.
प्रचारामुळे
तावडे, चव्हाण अनुपस्थित
महोत्सवाच्या उद्घाटनास शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार होते. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने तावडे हे प्रचार सभांमध्ये असल्याने हजर राहिले नाही.
त्याचबरोबर खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामीण भागातील निवडणुकांत तळ ठोकला असल्याने तेही अनुपस्थित होते.