संचारबंदीमुळे कॅबचालकाच्या लुटीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:50+5:302021-04-18T04:39:50+5:30
कल्याण : कॅबचालकास लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आदिल शेख आणि मुजाहिदीन लांजेकर, अशी ...
कल्याण : कॅबचालकास लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आदिल शेख आणि मुजाहिदीन लांजेकर, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संचारबंदीमुळे लुटीचा त्यांचा प्रयत्न फसला आहे.
मुंबईत ॲन्टॉप हिल येथे राहणारे मुन्वर हुसेन शेख हे कॅबचालक आहेत. १३ एप्रिल रोजी ते एक प्रवासी भाडे घेऊन डोंबिवलीस आले होते. भाडे सोडल्यावर ते पुन्हा कल्याणच्या दिशेने मुंबईला निघाले होते. त्यांची गाडी पत्रीपूल ते गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील फानूस ढाब्याजवळ आली. त्यावेळी दोन जणांनी त्यांची गाडी अडवून गाडीत घुसले. त्यांना चाकूचा धाक दाखवून गाडीचा ताबा घेतला. मुन्वर याच्याकडील रोकड आणि मोबाइल हिसकावून घेतली, तसेच गाडी कल्याण स्टेशनच्या दिशेने घेण्यास सांगितली. एटीएममधून पैसे काढून देण्याचा तगादा त्यांनी मुन्वरकडे लावला होता. गाडी कल्याण स्टेशनच्या दिशेने जात असताना समोर पोलिसांची गाडी येताना दिसली. पोलिसांना समोर येणाऱ्या कारमध्ये काहीतरी अनुचित घडत असल्याचा संशय आला. कार चालविणाऱ्या हॅण्ड ब्रेक लावून दरवाजा उघडण्य़ाचा प्रयत्न केला असता, तेव्हा मुन्वर यांनी आरडाओरडा केला. पोलीस गाडीच्या दिशेने धावले. त्यांनी मुन्वरला लुटणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण करीत आहेत. याप्रकरणी कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, अटक केलेल्या दोघांपैकी एकाच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी मिळून अन्य किती लोकांची लूट केली आहे याचा पोलीस तपास करीत आहेत.
---------------