म्हसा गावात जमावबंदी केली लागू; यात्रेवर कोरोनाचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:05 AM2021-01-30T00:05:02+5:302021-01-30T00:05:15+5:30
व्रत पूजन म्हणून मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या हस्ते म्हसोबाची पहाटे पूजा करण्यात आली, तर नागरिकांनी यात्रेला येऊ नये, म्हसा गाव परिसरात गर्दी करू नये
मुरबाड : महाराष्ट्रातील प्रसिध्द म्हसा यात्रेला पौष पौर्णिमेच्या दिवशी सुरुवात होते. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापन समितीने बैठक घेऊन यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला. परंतु भाविक राज्यभरातून दर्शनासाठी गर्दी करतील व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, यामुळे ग्रामपंचायतीने पोलिसांना पत्र देऊन यात्रा परिसरात जमावबंदी लागू करण्याची मागणी केली होती. ती मान्य करून २५ जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू केली असली तरी दर्शनासाठी भाविकांची तुरळक गर्दी झाली होती.
म्हसा यात्रा म्हटली की, महाराष्ट्रासह शेजारील राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. स्थानिकांबरोबरच व्यापारीवर्गासाठी ही यात्रा म्हणजे सुगीचे दिवस असतात. गुरांचा बाजार हे या यात्रेचे आकर्षण असते. अगदी टोपल्या, घोंगड्यांपासून विविध प्रकारच्या मिठाई, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल लागलेले असतात. लहान मुलांसाठी मनोरंजन, विविध खेळ येथे असतात. शनिवारी, रविवारी तर येथे चालायला जागा नसते इतकी गर्दी होते. अनेकजण खासगी वाहनातून येत असल्याने येथे कोंडी होते. तसेच यात्रेच्या काळात मुरबाड आगारातून एस. टी.ची खास व्यवस्था केली जाते. पण यंदा कोरोनामुळे यात्राच न भरविण्याचा निर्णय झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला.
दरम्यान, व्रत पूजन म्हणून मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या हस्ते म्हसोबाची पहाटे पूजा करण्यात आली, तर नागरिकांनी यात्रेला येऊ नये, म्हसा गाव परिसरात गर्दी करू नये, यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे जमावबंदी आदेश लागू करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार येथे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
पाेलीस, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
यात्रेत अनुचित प्रकार घडू नये, याकरिता हजारो पोलिसांबरोबरच परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते. यात्रेच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते. कोरोनाचे संकट कमी होत असले तरी धोका नको म्हणून मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ पष्टे व त्यांच्या समितीने निर्णय घेऊन यात्रा होणार नाही, असे जाहीर केले होते.