महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:25 AM2018-02-23T02:25:00+5:302018-02-23T02:25:02+5:30

वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

'Current' to the customers of MSEDCL? | महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

महावितरणच्या उद्दीष्टपूर्तीचा ग्राहकांना ‘करंट’?

googlenewsNext

कल्याण : वीजेचे चालू बिल न भरल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई महावितरणकडून सुरू असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी यांनी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना निवेदन देऊन ग्राहकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. थकबाकी असल्यास वीज पुरवठा खंडीत केला जातो हे मान्य आहे. परंतु, चालू बिलाची अंतिम तारीख उलटताच वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याची कारवाई चुकीची असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे. मार्च अखेरीच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हा प्रताप सुरू आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महावितरणच्या एजन्सीमार्फत वाटप केली जाणारी वीज बिले वेळेवर मिळत नसल्याची तक्रारही ग्राहक करतात. बिल अंतिम तारखेला अथवा दोन-तीन दिवस आधी मिळते. एखादे बील वेळेत नाही भरले तर वीज कर्मचारी वीज खंडीत करण्याची यादी घेऊन दारात येतात आणि कधी कधी ग्राहक घरी नसताना देखील त्यांचा वीज पुरवठा खंडीत करून जातात. याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे थकीत बिलावर वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईच्या आधी १५ दिवसांची नोटीस ग्राहकांना देणे बंधनकारक आहे पण तसे होताना दिसत नाही. महावितरणकडून काहीवेळा चुकीच्या रिडींगची भरमसाठी बिले ग्राहकांना पाठविली जातात. त्यात दुरूस्ती करावी, यासाठी ग्राहकांकडून अर्ज केले जातात. परंतु, दुरूस्ती वेळेत होत नसल्याने ग्राहकाचे नाव वीज थकबाकी यादीत येते. त्याचा नाहक त्रास ग्राहकाला सोसावा लागत असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे.
बिल दुरूस्ती होईपर्यंत संबंधित बिलावर ‘नो डिस्कनेक्ट’ असा शिक्का मारून देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वीज बिलावर मराठीमधील नाव आणि पत्ता चुकीचा लिहिला जातो, याबाबत विचारणा केली असता मराठी शब्द दुरूस्ती सॉफ्टवेअर आमच्याकडे नाही असे उत्तर मिळत असल्याकडेही दळवी यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: 'Current' to the customers of MSEDCL?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.