सध्याची समीक्षा अत्र परत्र या सीमारेषेवर आहे - जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ.अनंत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 04:38 PM2018-10-21T16:38:47+5:302018-10-21T16:43:56+5:30
कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्यानिमित्ताने साहित्यिक कोजागरी साजरी करण्यात आली.
ठाणे : र.धो कर्वेंवर संशोधन करताना माझ्या लक्षात आलं की य.दी.फडके या ज्येष्ठ साहित्यिकांनी र.धों.वर संशोधन करताना समाजस्वास्थ्यचे अंकंच पाहिले नाहीत. त्यामुळे फडकेंच्या संशोधनात त्रुटी असल्याचे आढळले. संशोधकाने चिकित्सकपणे सर्व गोष्टींचा विविधांगी विचार करायला हवा. सध्याची समीक्षा अत्र परत्र या सीमारेषेवर आहे, मराठी समीक्षा संक्रमणावस्थेतून जातेय असे मत जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ.अनंत देशमुख यांनी व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषद - साहित्यिक कोजागीरी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे को.म.सा.प.चे केंद्रिय अध्यक्ष डाॅ.महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जेष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ.अनंत देशमुख, कवी आणि पत्रकार प्रशांत डिंगणकर, अभिनेते संजय क्षेमकल्याणी, शशिकांत तिरोडकर आणि कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने उपस्थित होत्या. डॉ.अनंत देशमुख यांच्या ' शोधयात्रा' या संशोधनपर ग्रंथाच्या आधारे त्यांची मुलाखत को.म.सा.प अध्यक्ष मेघना साने आणि कार्यकारिणी सदस्य संगीता कुलकर्णी यांनी घेतली. अत्यंत सहज सुंदर रितीने आणि खुबीने देशमुख सरांचा साहित्यिक प्रवास रसिकांसमोर उलगडणारी मुलाखत बरच काही मोलाचं ज्ञान रसिकांना देऊन गेली. प्रशांत डिंगणकर यांनी डॉ. महेश केळुसकर यांच्या *जोर की लगी है यार*या कथासंग्रहाचे रसग्रहण केले. मधु मंगेश कर्णिक यांची प्रस्तावना असलेल्या या पुस्तकातील, 'जोर की लगी है यार', 'तिसरा सामना उत्कंठा' अशा कथांचा आढावा घेत, रोज आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचा घणाघाती विचार कथेत मांडलाय हे रसिकांपर्यंत पोहोचवला. कोरी काँफी कडू लागली तरी त्याची चव जिभेवर रेंगाळत रहाते तसेच या कथाही वास्तव जीवनातील कटू सत्य प्रभावी पणे सांगतात अस ते म्हणाले. अभिनेता संजय क्षेमकल्याणी यांनी केळुस्कर यांच्या कथासंग्रहातील *जोर की लगी है यार* या कथेचे अभिवाचन अत्यंत प्रभावी, अभिनयपूर्ण केले, त्यामुळे कथा अक्षरशः नजरेसमोर तरळून गेली. अध्यक्षीय भाषणात महेश केळुसकर यांनी पुस्तकाचा गाव वसवण्याचे सुतोवाच केले, मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे लागतील असंही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या वेळी को.म सा प सभासदांच्या पुस्तकांचे प्रदर्शन ही भरवले होते आणि सर्वांना थंडगार केसरी दूध कोजागरी निमित्ताने देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा बोर्डे यांनी केले.