बोगस ठेकेदारीचा ठाणे जिल्ह्याला शाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:06+5:302021-08-18T04:47:06+5:30
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांचे कोणतेच काम वेळेत पूर्ण केले जात नाही, हा ठाणे जिल्ह्याला शाप आहे. ...
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांचे कोणतेच काम वेळेत पूर्ण केले जात नाही, हा ठाणे जिल्ह्याला शाप आहे. जे ठेकेदार असतात, ते बोगस असतात; त्यामुळे मुदतीत काम होत नाही, असे खळबळजनक विधान केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी केले.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा ठाणे येथून काढण्यात आली. तिची सांगता कल्याण (पूर्व) भागातील आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात झाली. त्यानंतर कपिल पाटील यांना आपण ज्या कल्याण-शीळ रस्त्यावरून यात्रा केली, त्या रस्त्याची काय अवस्था आहे, अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, कल्याण-शीळ रस्त्याचे काम अडीच वर्षांपासून सुरू आहे. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याविषयी आमदार रवींर चव्हाण यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मागणीनुसार या कामाची चौकशी करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. शहापूर-कर्जत महामार्गाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
...............
शिवसेना, मनसेकडून सत्कार
मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेत पाटील यांचे स्वागत केले. याविषयी पाटील यांनी सांगितले की, राजू पाटील यांच्याशी माझे घरचे संबंध आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ते सदस्य होते. ज्याला कोणाला मला आशीर्वाद द्यायचा आहे, तो ते देऊ शकतात. त्यांना पक्षाच्या चौकटीत बांधणे योग्य होणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
....................
कोणाला मोडीत काढण्यासाठी मंत्रिपद नाही
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी तुम्हाला केंद्रात मंत्रिपद दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, याविषयी पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपदे दिली आहेत. ती भाजपला मोडीत काढण्यासाठी दिली आहेत का? असा प्रतिसवाल करीत पाटील पुढे म्हणाले की, कोणाला मोडीत काढण्यासाठी नव्हे तर पक्षवाढीसाठी मला मंत्रिपद दिले आहे.
.............